Bhor : संचमान्यतेला ‘आधार’ चा आधार
Bhor : शाळेत प्रत्यक्ष पटसंख्या असली, तरी ऑनलाईन आधार व्हेरिफिकेशन न झाल्यास तुकडी कमी होणे, परिणामी शिक्षक संख्या घटून शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

महुडे : चालू शैक्षणिक वर्षात (२०२६-२७) शाळांच्या ऑनलाईन संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध असणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. केवळ आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारावरच शाळांची पटसंख्या व संच मान्यता निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढलेले नाही किंवा ज्यांचे व्हॅलिडेशन प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांचे काम पूर्ण करण्यासाठी सध्या भोर तालुक्यातील शिक्षकांची मोठी धावपळ सुरू आहे.
शाळेत प्रत्यक्ष पटसंख्या असली, तरी ऑनलाईन आधार व्हेरिफिकेशन न झाल्यास तुकडी कमी होणे, परिणामी शिक्षक संख्या घटून शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. संच मान्यता जनरेट न झाल्यास शिक्षकांच्या वेतनाची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे रखडलेले आधार व्हॅलिडेशन सध्या शिक्षकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
भोर पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने शाळेतच केंद्र
या समस्येवर मात करण्यासाठी भोलावडे (ता. भोर) येथील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे भोर पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने शाळेतच आधार कार्ड अपडेट करण्याचे विशेष केंद्र सुरू करण्यात आले आहे. भोरचे पोस्टमास्टर चिमाजी कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांच्या सूचनेनुसार आधार ऑपरेटर प्रियांका ढाकणे गेल्या चार-पाच दिवसांपासून हे काम करत आहेत. सर्वर व तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रियेला वेळ लागत असला, तरी शिक्षकांवरील टांगती तलवार दूर करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
आधारकार्ड अपडेट करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना आर्थिक खर्च येतो. ग्रामीण भागातील पालक असल्याने वेळ आणि पैसे खर्च करू शकत नाही. त्यामुळे आम्ही संस्थेच्या वतीने भोर पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने शाळेतच आधारकार्ड अपडेट करून देण्यासाठी यंत्रणा उभी केली असून याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
-प्रमोद गुजर, अध्यक्ष, नियामक मंडळ, भोर एज्युकेशन सोसायटी, भोर.





