‘एक शून्य प्रतिक्रिया’

‘‘किती पेरला जीव
तरी कोरडीच ओल
ओतले आयुष्य परी
देह जाईनाच खोल’’ (पान-१५)

अशा शब्दांत कास्तकारांच्या, शेतकर्‍यांच्या व्यथा, वेदनांची दखल घेणारी कविता व्यंकटेश चौधरी यांनी लिहिली आहे. ‘एक शून्य प्रतिक्रिया’ नावाच्या दमदार कविता संग्रहाद्वारे त्यांनी मराठी साहित्य विश्‍वात यशस्वीपणे पुनरागमन केले आहे. या संग्रहात एकापेक्षा एक सरस अशा एकूण ७७ कविता आहेत. चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या अर्थसघन मुखपृष्ठासह शद्बालय प्रकाशनाने निर्मितीही देखणी केलेली आहे. सदरील संग्रहाला कुणाच्या प्रस्तावनेच्या कुबड्या नाहीत की मलपृष्ठावर कुणाची पाठराखण नाही. मनोगतालाही फाटा देत जणू काही कवीने ठणकावून सांगितले आहे, जे काही आहे ते यातील कविता आहेत. कुणाच्या कुबड्यांनी किंवा पाठराखणीने मिळालेले मोठेपण तसे कुणाच्याही कामी येत नसते. मोठेपणा, श्रेष्ठता ठरविणारी कलाकृतीच असते.
७७ कवितांतील अनेक कवितांतून वेगवेगळ्या जाणिवा व्यक्त झालेल्या आहेत. तरी शेती, शेतकरी, त्यांचे सुख-दुःख, जगणं, भोगणं हा यातील बहुतांश कवितांचा केंद्रीय आशय राहिलेला आहे. कवी शहरातील सिमेंटच्या घरात सुखाने राहात असला तरी त्याचे मन शेती, मातीशी, नदी-नाल्यांशी घट्टपणे चिटकलले आहे. तो मनाने पांढरपेशा बनलेला नाही.
‘‘अण्णा,मन्याडीच्या कुशीत
बोट धरून चालणं शिकवलंस
सांगितलीस कष्टाच्या महात्म्याची कानगोष्ट
उतू नये मातू नये कविता म्हणून
जळत पोळत राहो ती तुझ्या कढत उन्हात
लाभो तुझ्या रखरखीत तळव्याचा काबाडस्पर्श
माझ्या कवितेला…’’
ही या संग्रहाची अर्पणपत्रिका कवीवरील संस्कार, जुळलेली नाळ स्पष्टपणे खूप काही सांगून जाते. कालही आणि आजही उभारी देणारी मन्याड नदी, तिच्या खोर्‍यातील सुपीक शेतजमीन, कमी कमी होत जाणारा पाऊसकाळ, त्यामुळे कष्टी होणारे मायबापाचे रापलेले चेहरे हे न विसरता येणारे संचित आहे.
बापावरची नितांत सुंदर कविता आहे. उन्हाच्या जाळानं पोळणारा बाप, प्रकृती बरी नसतानाही खतासाठी रांगेत तिष्ठणारा बाप, पोराला कष्टाच्या महात्म्याची कानगोष्ट सांगणारा बाप, अशा अनेक रूपात या कवितेत भेटतो. कष्टाला, श्रमाला तो घाबरत नाही. त्याची एकच इच्छा आहे की, पाऊसपाणी भरपूर व्हावे. शेत आबादानी व्हावे, एवढीच त्याची अपेक्षा आहे.
‘‘रान कासावीस सारं
देवा तुझ्या पायी
वाहू दे चंद्रभागा,
हंबरती गायी’’ (पान-२१)
आभाळाला पान्हा फुटावा म्हणून व्याकुळतेने विठूला प्रार्थना करणारी कवीची कविता पसायदानाशी पैजा लावणारी आहे. ढेकळांच्या हाती आयुष्य दिलं तरी कुणब्याच्या आयुष्याच्या भेगा का बुजत नाहीत असा तुकोबा, जोतीबासारखा रोकडा सवालही पुसणारी आहे.
‘‘माय
रानभर
पसरली
राखंत
रान राखण्याचा
तिचा रिवाज
सुटला नाही
मरणानंतरही’’ (पान-९१)
ऐन पावसाळ्यात आई गेली. कुणाला काही न सांगता! सोशिक स्त्रिया न बोलताच खूप काही सांगत असतात. आपलीच आकलन क्षमता कमी असते. बापासारखाच आईचाही जीव रानात आडकलेला, रमलेला आहे. मृत्यूनंतर माझी राख काशीला नेऊन टाकण्याऐवजी शेतात पसरून टाका. म्हणजे मी पिकासोबत उगवून येईल. या निमित्ताने मला शेताची, राखण, निगराणीही करता येईल. शेत राखण्याचा आजवरचा रिवाज, आईने मृत्यूनंतरही पाळला. अशा आशयाची ही एक अप्रतिम कविता.
‘कविता बाईलेकीच्या’ या सदरातील सर्वच कविता आई, बहीण, मुलगी, सखी, प्रिया यांच्या विषयी कृतज्ञताभाव व्यक्त करणार्‍या आहेत. महत्ती गाणार्‍या आहेत. मराठी साहित्य विश्‍वातील मोठमोठ्या साहित्यिकांनी साहित्यातून महिलांची महत्ती गाईली नि प्रत्यक्ष जीवनातील व्यवहारात स्वस्त्रियांचा खूप छळ केलाय. निसर्गकवी म्हणून ज्या बालकवींचा उल्लेख केला जातो ते पार्वतीबाई ठोंबर्‍यांना काटेरी फांदीने मारत असत नि गोलपिठातील नामदेव ढसाळ मल्लिका अमरशेख यांचे जीवन उद्ध्वस्त करेपर्यंत छळत असत. व्यंकटेश चौधरी याला अपवाद आहेत. ते साहित्यकलेतून जसे व्यक्त होतात तसेच ते प्रत्यक्ष जीवनातही तसेच वागत असतात. त्याशिवाय नितळ, निरोगी नि प्रांजळ जाणिवेची कविता लिहिणे शक्य नसते. ‘सखी’ या कवितेत ते लिहितात-
‘‘सखी,
काळाच्या पाक्तनावर
आता कोरलेय तू
तुझ्या कर्तृत्ववान पावलांच्या
अमिट ठशांचे शिल्प
घे भरारी म्हणण्याचे
संपून गेलेत दिवस आता
इतकी पावलांना आलीय गती
नाही,
ती तुझ्या आत्मविश्‍वाशी
परिश्रमांनी दिलीय’’ (पान-१०१)
कर्तृत्ववान पत्नीच्या कष्टाला, कर्तृत्वाला मान्यता देणं, स्वीकारणं पुरुषसत्ताक मानसिकतेला रुचत नाही. मान्यता देणं कमीपणाचं वाटतं. अशा पार्श्‍वभूमीवर ‘सखी’ या कवितेत व्यक्त केलेली भावना अधिक सच्ची म्हणून मराठी कवितेत अनोखी वाटू लागते.
व्यंकटेश चौधरी यांच्या कवितांचा आणखी एक महत्त्वाचा विशेष नोंदवता येतो तो असा की, त्यांच्या कवितेत येणार्‍या कष्टकरी महिला संघर्षशील असून, प्रचंड आशावादी आहेत. तुलनेने आपल्या कष्टकरी पतीच्या शेतकरी, कास्तकारांच्या व्यथा, वेदनांसंबंधीचे साहित्य वाचताना मला एक प्रश्‍न नेहमीच पडत आला आहे. शेतातील नापिकीला कंटाळून, कर्ज फेडता न आल्यामुळे कर्जबाजारी झालेले शेकडो, हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. काहींनी केल्या आहेत. आत्महत्या कुणी फॅशन म्हणून करीत नाही हे सत्य असले तरी याच कारणांमुळे कष्टकरी महिलांनी विधवा, परित्यक्त्या असलेल्या उपेक्षित महिलांनी आत्महत्या का केल्या नाहीत. काहींनी केल्या असतील, पण त्याचे प्रमाण नगण्य आहे. याचे सुसंगत उत्तर काय द्यायचे? ज्या शेतकरी बंधूंनी आत्महत्या केलीय, त्यांच्या माघारी त्यांच्या सर्व प्रकारच्या जबाबदारीचा, शेताचा, घराचा डोलारा पडत झडत का होईना याच कष्टकरी महिलांनी सांभाळला आहे. जीवाची परवड होत नसेल असे नाही; पण म्हणून या महिला आत्महत्या करतात असे घडत नाही. असे का?
या प्रश्‍नाचे उत्तर व्यंकटेश चौधरी यांची कविता देते.
‘‘बाई मात्र खुपते, धुपते आतल्या आत
खोल खोल पुन्हा पुन्हा
गोंदवून घेत वेदनेची वेल अंगभर
आत्महत्येच्या नित्य धडका देणार्‍या आवाजाला
लाथाडून’’ (पान-९७)
देहाची पालखी भरून झिजल्यानंतरही एकही हिरवा कोंब उगवत नाही हे ठाऊक असूनही ऊर फुटेस्तोवर खपले तरी काहीही मनाजोगते घडणार नाही, हे ठाऊक असूनही बाई प्रतिकुलाच्या छाताडावर लाथा हाणून निष्क्रियतेने भरलेल्या शेतीमातीत परिश्रमाचे बीज पेरत जाते. चार दोन हंगाम बेईमान झाले म्हणून काय झाले? निसर्गही कुणाच्या रुजण्याचा ध्यास रोखत नसतो. कुठल्याही काळात, कसल्याही कठीण परिस्थितीत अंधारावर उजेडाचंच साम्राज्य असतं हा विश्‍वास या लढाऊ, जिगरबाज जोतीबा फुल्यांच्या कुळवाडीभूषण असलेल्या बाईला पराभूत होऊ देत नसतो. नाउमेद होऊ देत नसतो. आत्महत्येच्या विचाराला लाथाडण्याएवढा बळकट नि खंबीर बनवत असतो.
अशी कणखर, धीराची बाई आत्तापर्यंत कृषी जीवनासंबंधी, शेतकरी बंधूंच्या जीवनासंबंधी लिहिणार्‍या कुठल्याच कवितेत, कथेत, कादंबरीत आलेली नाही. अपवाद शंकर पाटलांच्या भुजंगमधील जनाई. बाकीच्यांनी शेतकरी बंधूंच्या आत्महत्येचे, व्यथा-वेदनांचे भांडवल करून त्यावर कविता, कथा, कादंबर्‍या लिहून अमाप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळविले. काही महाभागांनी तर ज्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आणली त्या सरकारच्या पैशावर चालणार्‍या सभा-संमेलनातून मिरवून घेतले. सरकारी कमिट्या, पुरस्कार मिळविले. यशस्से अर्थकृते लिहिणे-तसे विकृतच असते. या व्यावसायिक लेखक, कवींपेक्षा व्यंकटेश चौधरी यांची कविता आगळी आणि वेगळी असल्यामुळे मराठी भाषा, मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणीच राहील.
‘संपलं आहे दशक’ अशीच एक समकालीन भयावह सामाजिक, राजकीय वास्तवाचा वेध घेणारी जबर कविता. संवेदन कवी, लेखकांना स्वतःची एक भूमिका असली पाहिजे. त्यांनी उजेडाला उजेड म्हणून अंधाराला विरोधच केला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही लेखकाची लेखनकृती, कलाकृती ही राजकीय कृतीच ठरत असते. त्याची भूमिकाच उजागर करीत असते. कुणाच्या रागा-लोभाची नि लाभाची पर्वा न करता व्यंकटेश चौधरी यांची भूमिका या कवितेत स्पष्टपणे आलेली दिसून येते. हजारो वर्षांच्या परिश्रमातून, संघर्षातून मानवी संस्कृतीने मिळवलेली मानवीमूल्य या दशकाने उद्ध्वस्त केलेली आहेत. सत्तेच्या आश्रयाखाली काही विषारी संघटना, माणसे, माणसा-माणसांतील जिव्हाळा, प्रेम, भाईचारा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही विषारी माणसे समाजात दुहीच्या बिया पेरून ठेवतात. त्याला जाती-धर्माचे, संप्रदायाचे खतपाणी घालतात. मना-माणसांची झालेली फाळणी कुठल्याही देशाला, समाजाला कमजोर करीत असते. आतून पोखरत असते. ते विध्वंसक असतात.
‘का बदलतात इतिहास?’ असा प्रश्‍न कवीला त्याचा मुलगा विचारतो.
हा प्रश्‍न मुलाने बापासह तुम्हा-आम्हांलाही विचारलेला आहे. इतिहासात ज्यांचे कर्तृत्व शून्य असते किंवा जे कला, इतिहास, संस्कृतीचे मारेकरी असतात ते नीतिशून्य, शूद्र माणसे इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नेहमीच बळीराजापेक्षा वामन श्रेष्ठ वाटतो, ज्यांचे आदर्श हिटलर, नत्थुराम असतात ते म. गांधींचा इतिहास बदलण्याचा नेहमीच प्रयत्न करतात.
युद्धखोरांना, कत्तलखोरांना अहिंसा आणि शांततेची नेहमीच प्रचंड भीती वाटत असते. म्हणून ते नेहमी भावाभावांत, गावागावांत, जाती-धर्मात महाभारत कसे घडेल याची आखणी आणि अंमलबजावणी करीत असतात. गेल्या काही वर्षातील ही भयावह परिस्थिती-
‘‘लाभू देत नाहीत सुरक्षित,
सुखाचा श्‍वास चार भिंतीच्या आड
इतकी दहशत स्वैर फिरते आहे राजरोस
उद्दाम, उन्मत्त सर्वत्र भयाचं द्रावणच जणू मिसळून टाकलंय
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या पाण्यात
इतकी सार्वजनिक झालीय भीती’’ (पान-३७)
भययुक्त समाजात शेती, शिवार पिकत नसते. वाढत नसते उंची, विकास येणार्‍या पिढ्यांचा. धोका असतो लोकशाही, स्वातंत्र्याला, मानवी समाजाच धोक्यात येतो-हे सत्य संवेदनशील कवीने धाडसाने मांडले आहे.
अलीकडील काळात तर शासकीय पातळीवरून खोटं बोल, पण रेटून बोलचे प्रमाण वाढते आहे. आपण म्हणू ती लोकशाही, ठरवू ते स्वातंत्र्य! अशा हेकेखोर नि दुराग्रही लोकांची चलती आहे.
सरकारी धोरणांना, धारणांना विरोध करणारांना जेलात ठेवणे, गोळ्या घालून ठार मारणे, मॉब लिचिंग करणे यालाच अच्छे दिन म्हणले जात आहे. त्यावर भाष्य करणार्‍या या ओळी-
‘‘खुशाल जगा हे स्वातंत्र्य तुम्ही
करा कत्तल राजरोस पशूंची माणसांची भावनांची
वागा वाट्टेल तसं वाट्टेल त्याच्याशी’’ (पान-१७, १८)
असा उजेड खुडून अंधार पेरणार्‍यांना कवीने इशारा दिला आहे. सत्ता येते, जाते. ऊतू नका, मातू नका. शंभर गुन्हे भरल्यानंतर नैसर्गिक न्यायाने होत्याचे नव्हते होईल. नैसर्गिक आपत्ती येऊन विषमतेने वागणार्‍यांचा सर्व नाश होईल अन् समता येईल. ‘बाळाच्या आईस’ या कवितेत बाळाला आईने काय काय शिकवावं हे सांगत सांगत कवीने आईला बजावले आहे.
‘‘पण एकच कर
तो ‘माणूस’ होईल
याची जीवजतन
काळजी मात्र
जरूर घे’’ (पान-१०६)
ही नितांत सुंदर कविता पालक असलेल्या सर्वांनी वाचलीच पाहिजे. बाळावर, मुलांवर प्रचंड संस्कार करण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे. याशिवाय आणखीही काही उत्तम कविता या संग्रहात आहेत. गंभीरपणे मराठी साहित्याचे वाचन करणार्‍या हरेकाच्या संग्रही असावा इतक्या महत्त्वाचा हा कवितासंग्रह आहे. कविता ही आत्माभिव्यक्ती असली तरी ती समकालावरची कठोर समीक्षाही असते. समकालातील प्रश्‍नांना बगल न देता थेटपणे भिडणार्‍या या कवीच्या धाडशी कवितेला शुभेच्छा.

-प्रकाश मोगले, नांदेड
कवितासंग्रह-एक शून्य प्रतिक्रिया
कवी- व्यंकटेश चौधरी
प्रकाशक-शद्बालय प्रकाशन, श्रीरामपूर
किंमत – रु. २००/-
पृष्ठे १२८

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here