पुणे जिल्हा | बैलगाड्याचा नंबर लावण्याच्या वादातून तरुणाला मारहाण

मंचर, (प्रतिनिधी) – वाळुंजवाडी (ता. आंबेगाव) येथील बैलगाडा घाटामध्ये बैलगाडा शर्यत सुरू असताना टोकन लावण्याच्या कारणावरून कुणाल संतोष खिरड (वय २१, रा. वडगाव काशिंबेग ता. आंबेगाव) याला मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी कमलेश निघोट, प्रथमेश निघोट, हर्षल निघोट, प्रमोद लोंढे, भावेश निघोट व इतर सहा अनोळखी व्यक्तींवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनेश रामदास खिरड यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळुंजवाडी येथे शनिवार, दि. २० रोजी श्री गणेश यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कुणाल संतोष खिरड, सिद्धेश खिरड, मयूर खिरड, अमोल खिरड हे बैलगाडा घाटात शर्यत पाहण्यासाठी गेले होते.
त्यावेळी कुणाल संतोष खिरड यांच्या गाड्याची टोकनप्रमाणे शर्यत पूर्ण झाली. त्यावेळी बैलगाडा घाटातून बैलांच्या मागे पळत असताना कुणाल खिरड याला कमलेश निघोट, प्रथमेश निघोट, हर्षल निघोट, प्रमोद लोंढे, भावेश निघोट व इतर सहा इसम (सर्व रा. वाळुंजवाडी, ता. आंबेगाव) यांनी घाटामध्ये टोकन नंबरला लावल्याचे कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ दमदाटी केली.
त्यावेळी कमलेश निघोट याने हातात असलेल्या पत्र्याचा डबा कुणालच्या डोक्यावर पाठीमागे मारला. तर हर्षल निघोट याने हातातील काठीने कुणालच्या पाठीवर मारले व इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. घाटात जमा झालेल्या इतर तरुणांनी भांडणे सोडवली. मारहाणीत जखमी झालेला कुणाल संतोष खिरड याला उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी दाखल केले होते.
त्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी ससून येथे घेऊन जाण्यास सांगितले असून कुणाल याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी मारहाण करणाऱ्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार आढारी पुढील तपास करत आहे.





