वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौकात डंपरने महिलेला चिरडले, नागरिकांकडून तीव्र निषेध

वाघोली : वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौकात डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २८) सकाळी आठच्या सुमारास घडली. भारती प्रकाश देठे ( वय ४५, रा. विश्रांतवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारती या दुचाकीवर जात होत्या. वाघेश्वर मंदिर चौकात डंपर भावडी रोडकडे वळत होता. त्यांच्या दुचाकीला डंपरचा धक्का त्या डंपरच्या मागील चाकाखाली आल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालक हिंमत जालिंदर कारके (वय ४२, रा वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी दत्तातेय राजू गोरे यांनी फिर्याद दिली.
श्रद्धांजली अर्पण; प्रशासन, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध
दरम्यान, वाघोली ग्रामस्थांच्या वतीने अपघातात मृत्युमुखील पडलेल्या महिलेला छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. घरातून बाहेर पडल्यावर घरी सुखरूप येईल का नाही याची शास्वती आज नाही, प्रशासनाची भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत आहे, बेकायदेशीर वाहनांकडे दुर्लक्ष केले जात, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा कडक शब्दात उपस्थित नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
वाघेश्वर मंदिर चौकात अपघात; महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर
वाघेश्वर मंदिर चौकाच्या पुढे दुचाकीवर पती-पत्नी असताना मागून आलेल्या टँकरने धडक दिली, ज्यामुळे दुचाकी मागील कंटेनरला आदळली. या चक्राकार अपघातात दुचाकी आणि त्यावरील दोघे टँकर व कंटेनरच्या मध्ये सापडले. यामध्ये दुचाकीवरील सुरेखा रणवरे (रा. वाघोली) यांचे दोन्ही पाय फ्रक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) रात्री नऊ वाजता घडली असून, टँकर चालक फरार झाल्याने वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




