“५ तारखेला विजयी मेळावा निघणार, राजकीय लेबल लावू नका”; राज ठाकरेंचे आवाहन

Raj Thackeray | हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी एकत्र येऊन ५ जुलैला विजयी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर अजिबात तडजोड केली जाणार नाही. सरकारने समिती नेमली तिचा अहवाल काहीही येऊ द्या, पण पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. हे मराठीवरील संकट म्हणूनच पाहायला हवे. त्याला राजकीय लेबल लावू नका. ५ तारखेला मोर्चा ऐवजी मेळावा होईल. हा मेळावा मराठी माणसांच्या एकजुटीचा आणि भाषिक अभिमानाचा प्रतीक ठरणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. Raj Thackeray |
मराठी माणसांच्या एकजुटीचा आणि विजयाचा उत्सव
“फडणवीस सरकारने निर्णय घेतल्यानंतर संजय राऊतांनी मला फोन केला. पुढे काय करायचं, असं मला त्यांनी विचारलं. मी त्यांना मोर्चा रद्द करावा लागेल असं म्हटलं. मग विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. ५ जुलैला विजयी मेळावा होईल. या मेळाव्याला पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही, हा मराठी माणसाचा विजय आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, या मेळाव्याचे ठिकाण आणि इतर तपशील लवकरच ठरविण्यात येणार आहेत. Raj Thackeray |
‘पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही’
पुढे राज ठाकरे म्हणाले, “मराठीच्या मुद्द्यावर कोणताही झेंडा नसेल, मराठी अजेंडा असेल हे मी आधीच जाहीर केले होते. राज्य सरकारमधील अनेक मंत्री, आमदारांनी या निर्णयाला विरोध केला. अजित पवारांनीही याला विरोध केला हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. मग जाधव येऊ द्या नाहीतर अजून कुणी येऊ द्या. महाराष्ट्रात ज्याप्रकारे मराठी माणसांनी विरोध केला आहे याची जाणीव जाधव यांना असावी.”
“जर हा मोर्चा निघाला असता तर, भुतो न भविष्यति असा मोर्चा निघाला असता. हा मोर्चा पाहून ७०-७५ वर्षांच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता, त्यामुळे परत सरकार अशा भानगडीत पडणार नाही, अशी आशा मी बाळगतो,” असंही राज ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबले असून भाषेवर उगाच विषय आणू नका. विधानभवनात जे विरोधक आहेत त्यांनी अधिवेशनात या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये. जे इतर विषय आहेत त्यावर बोलावे. अजून बऱ्याच शैक्षणिक समस्या आहेत. शिक्षकांना पगार नाही. शिक्षकांवर इतर बोझा टाकला जातो, यावर विरोधकांनी लक्ष घालावे,” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. Raj Thackeray |
हेही वाचा:
हैदराबादमधील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट ; १० जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक जखमी




