Sanjay Raut : या सरकारला पनवती सरकार का म्हणू नये? संजय राऊत यांची बोचरी टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशात अनेक मोठे अपघात आणि काही घातपाताच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या या सरकारला पनवती सरकार म्हणायला हरकत नाही, असे म्हणताना उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा महायुती सरकारवर टीका केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात आणि देशात घडणाऱ्या अपघातांवरून सरकारवर निशाणा साधला. या अपघातांचा पाढा वाचत राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. देशात आणि राज्यात अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरू आहेत. ऑपरेशन सिंदूर झाले, त्यात पूंछला 17 लोक मारले गेले. त्याआधी पहलगाम हल्ला झाला, त्यात 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. अहमदाबादमध्ये भयानक अपघात झाला, तो अपघात होता की आणखी काही याचा तपास सुरू आहे.
त्यातही महाराष्ट्राचे 15-16 लोक मरण पावले. काल राज्यात दोन दुर्घटना घडल्या. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदी यांनी बसवला होता तो आधी कोसळला. त्यात आधी भ्रष्टाचार झाला होता. त्यानंतर सरकारने मोठा गाजावाजा करत काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला. पण याबाबत काल जे चित्र समोर आले, त्यानंतर या सुद्धा कामात भ्रष्टाचार झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
मावळ भागातल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीतला एक पूल कोसळला, वाहून गेला आणि यात किती लोक मृत्यू पावले याचा खरा आकडा बाहेर आलेला नाही. लोक वाहून गेले. त्या पुलावर 100 पेक्षा जास्त पर्यटक उपस्थित होते आणि तो पूल कोसळला. यात किमान ५० लोक वाहून गेले. केवळ पाचच मृतदेह सापडले, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज्यात घडलेल्या अपघातांच्या घटनांचा पाढा वाचून दाखवला आणि सरकारवर टीकास्त्र डागले.





