vegetable seller : तीन हजारांच्या कर्जासाठी भाजी विक्रेत्याची निर्वस्त्र धींड

नवी दिल्ली – तीन हजार रूपयांचे घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे एका भाजी विक्रेत्याला (vegetable seller) मारहाण करत त्याची संपूर्ण बाजारात निर्वस्त्र धींड काढण्यात आली. नोएडा येथील या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विशेष या घृणास्पद घटनेचा एक व्हिडिओही बनवण्यात आला होता आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली.
संबंधित भाजी विक्रेत्याने 3 हजार रूपये आरोपींकडून कर्ज घेतले होते. या पैशातून त्याने लसूण खरेदी केली होती. मात्र त्याला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे त्याला नुकसान सोसावे लागले होते. तरीही कर्जाची रक्कम परत फेडण्यासाठी त्याची जुळवाजुळव सुरू होती.
मात्र आरोपींनी त्याच्याकडे तगादा लावला होता. अखेर मंडईत जाऊन त्यांनी अगोदर त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला निर्वस्त्र करत त्यांनी पूर्ण बाजारात धींड काढण्यात आली.
हा प्रकार सोशल मीडियावरही व्हायरल झाल्यामुळे संतापाची लाट उसळली. पोलिसांनाही झाल्या प्रकाराची दखल घ्यावी लागली. त्यांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली जाणार असल्याचे म्हटले आहे.





