आॅल्मिपिकवीर खाशाबा जाधव यांना अनोखे वंदन

पुणे – महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक आॅल्मिपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना अनोख्या पद्धतीने राज्य शासनाने अभिवादन केले आहे. क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाप्रती स्मरण म्हणून त्यांचा जन्मदिन १५ जानेवारी यापुढे राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दि. १२ ते १८ डिसेंबरदरम्यान क्रीडा सप्ताह, तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर राज्याचा क्रीडा दिन साजरा व्हावा, अशी मागणी शासनाकडे होत होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालये, क्रीडाप्रबोधिनी, क्रीडा संकुले, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच शासनमान्य खाजगी विद्यापीठे, एकविध क्रीडा संस्था, असोसिएशन, क्रीडा मंडळे, क्रीडा अकादमी, शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ व अनुदान मिळालेल्या सर्व संस्थांना राज्य क्रीडा दिनादिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागणार आहे.
युवा खेळाडूंना मिळणार प्रेरणा
सन १९५२ मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथे आॅल्मिपिक स्पर्धा पार पडल्या. त्यावेळी स्वातंत्र्य मिळून आपल्या देशाला जेमतेम पाच वर्षे झाली होती. त्या वातावरणातही खाशाबा जाधव यांनी कुस्तीचा कसून सराव केला आणि या स्पर्धेत पहिले वैयक्तिक आॅल्मिपिक पदक (कांस्य पदक) पटकावले. खाशाबा जाधव यांच्या या कामगिरीमुळे राज्यासोबतच देशाचा गौरव वाढला. त्यांच्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा, त्यातून नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी राज्य क्रीडा दिन साजरा केला जाणार आहे.





