Shirur News : रांजणगाव पोलिसांची कर्तव्यदक्षतेची एक वेगळी चुणूक; अथक परीश्रम घेत हरवलेल्या मुलीला केले आईच्या स्वाधीन

शिरूर : रांजणगाव मधून वडिलांशी घरात किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात १२ वर्षीय आशियाना वहीद अन्सारी ही मुलगी दि.२३ रोजी सकाळी 10 च्या दरम्यान घर सोडून निघून गेली होती. तीचा शोध घेऊन ती दुपारपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत मुलीचा शोध घेण्याकामी रडत रडत विणवणी केली.
त्यांनंतर लगेच सदर मुलीचा शोध घेण्या कामी तात्काळ तीन पथके नेमण्यात आली होती. त्या आईच्या मातृत्वाचे दुख पाहून पो.कॉ.गणेश वाघ यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवून नेटवर्कच्या माध्यमातून तत्परतेने पुणे ग्रामीण व पुणे शहर हद्दीतील आजू बाजूच्या सर्व पोलीस स्टेशनला तात्काळ कॉल केले असता येरवडा पोलीस स्टेशन येथे सदर मुलगी असल्याची माहिती प्राप्त झाली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण यांनी कार्यतत्पर राहून कर्तव्याशी प्रामाणिक असलेले पो .हवा. संदिप जगदाळे व महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी कौतुक केलेल्या पोलिस कॉन्टेबल महिला चालक शुभांगी लबडे यांना येरवडा पोलीस स्टेशन येथे मुलीला घेऊन येणे कामी तात्काळ रवाना केले.
पोलीस स्टेशन येथे इतर तक्रारींची लगबग चालू असताना देखील ठाणे अंमलदार मदतनीस पो कॉ. अजित पवार,अंमलदार जागृती मचिंदर, वायरलेस अंमलदार निशा हुंडेकर यांनी पीडितेच्या आईस धीर देऊन पोलिसांचा मातृत्वाविषयीं असलेला आदर दाखवून दिला. कर्तव्यदक्षतेची आणखी एक वेगळी चुणूक म्हणजे नाईट राऊंड पोलिस उपनिरीक्षक पासलकर व चालक पो. हवा माऊली शिंदे यांनी नाईट राऊंडला रवाना होण्याऐवजी सदर मुलीचा शोध घेणेकामी सर्व परिसर पिंजून काढला. एका मातेला तिची मुलगी तातडीने कर्तव्य तप्तर राहून स्वाधीन केल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





