बेरजेच्या राजकारणात राजकीय वजाबाकीमुळे “ट्विस्ट’

राजेंद्र मोहिते
कराड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बेरजेचे राजकारण करण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी एकजूट केली. त्याला शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुहूर्त गवसला. त्यानुसार शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून तिघांनीही आपापल्या दिग्गजांना मैदानात उतरवले. परंतु, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी दस्तूरखुद्द आ. बाळासाहेब पाटील यांच्या बंधूंनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या बेरजेच्या राजकारणातच राजकीय वजाबाकी झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एक प्रकारचा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
कराड बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून तालुक्यातील दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक अपेक्षित तर काही अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी काहींनी एकजूट करत सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलाच चंग बांधल्याचे दिसून येत आहे. त्यात अंतिम उमेदवार आणि चिन्हवाटप झाल्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून सभांमध्ये दोन्हीकडून एकमेकांविरोधात राजकीय हल्ले- प्रतीहल्ले सुरु झाले आहेत. या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे बंधू जयंतकाका पाटील यांच्यासह त्यांचे दिग्गज समर्थक मानसिंगराव जगदाळे, उद्धवराव फाळके, विनोद जाधव, जयवंत मानकर, प्रदीप शिंदे व देवाप्पा पिसाळ यांच्या पत्नी सौ. मालन पिसाळ यांना रणांगणात उतरवले.
तसेच माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी त्यांचे चिरंजीव मानसिंग पाटील यांच्यासाठी भोसले गटातून उमेदवारी घेतली. डॉ. अतुलबाबा भोसले यांनीही त्यांचे दिग्गज पारंपरिक समर्थक दयानंद पाटील, जगदीश जगताप, आनंदराव मोहिते, दत्तात्रय साळुंखे व दिलीप पवार यांच्या पत्नी सौ. रेखाताई पवार यांना रणांगणात उतरवले. त्यामुळे या निवडणुकीत एकंदरीत शेतकरी विकास पॅनेलची बाजू भक्कम असल्याची तालुक्यात चर्चा होती. परंतु, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आमदारांचे बंधू जयंतकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. याला प्रामुख्याने आगामी विधानसभा निवडणुकीसह उत्तरेतील वाढता विरोध, पक्षीय दबावतंत्र व स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील नाराजी आदी अनेक कंगोरे असल्याची चर्चा आहे.
जयंतकाका पाटील यांच्या अनपेक्षित माघारीमुळे इकडे भाजपच्या गोटात मोठी नाराजी पसरली आहे. याचा प्रत्यय शेतकरी विकास पॅनेलच्या अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आला. डॉ. अतुलबाबा भोसले आणि माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यावेळी अनुपस्थित राहिले. तसेच ‘त्याच त्या’ लोकांना उमेदवारी दिल्याने भोसले गटातील इतर स्थानिक नेते नाराज असल्याचीही चर्चा सध्या दक्षिणेत सुरू आहे. त्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे मोठे आव्हान डॉ. भोसले यांच्यासमोर उभे आहे.
सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तोंडसुख
काही धनदांडगे लोक कै. विलासकाकांनी आदर्शवत चालवलेल्या संस्था सत्तेच्या लालसेपोटी गिळंकृत करू पाहत आहेत. शेती उत्पन्न बाजार समितीसारखी संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी असून ती सर्वसामान्य लोकांकडेच राहिली पाहिजे. काकांच्या पश्चात उदयसिंह पाटील- उंडाळकर या संस्था चालवण्यासाठी सक्षम असून मतदारांनीही लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनलच्या माध्यमातून त्यांना साथ द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वसंतगड येथील मेळाव्यात केले. तर कै. काकांनी समाजकारण करताना सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. आज त्याच लोकांना हटवून सत्ता काबीज करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न चालवले असून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी केले आहे.
सत्ताकाळातील विकासकामांचाच अजेंडा
बाजार समितीची निवडणूक लढवत असताना आमच्या सत्ताकाळातील विकासकामांचाच अजेंडा घेऊन मतदारांसमोर जाणार असल्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपली वाढ खुंटवणाऱ्या आणि मुळे छाटणाऱ्यांना चोख प्रतिउत्तर देणार असल्याचे माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. तसेच सध्याच्या सत्ताधाऱ्यांबद्दल आणि त्यांच्या कारभाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचे मत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नुकतेच पाल येथील शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी, शेतमालाला वाढीव दर ठेवून शेतकरी समृद्ध करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठीची संस्था राज्यात आदर्शवत बनवण्यासाठी परिवर्तन अटळ असल्याचेही त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.




