पुणे | “खडकवासला’साठी मुंबईत रस्सीखेच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. विद्यमान आमदारांसह या मतदारसंघातील सर्वच इच्छुक मुंबईत तळ ठोकून आहेत.
तर, या मतदारसंघात पक्षाने भाजपचाच उमेदवार द्यावा अशी मागणी या सर्वांकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यासाठी सर्वच इच्छुकांकडून आपल्या समर्थकांसह या दोन्ही नेत्यांकडे हजेरी लावली होती.
मात्र, “पक्षाला काय निर्णय घ्यायचा हे माहिती आहे. पक्ष निर्णय घेईल तुम्ही परत जाऊन पक्षाचे काम सरू करा,’ असे सांगत या सर्वांना पुण्याला रवाना करण्यात आले आहे.
भाजपने रविवारी राज्यातील ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूड मतदारसंघाचा समावेश असून खडकवासला, कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदारसंघात अद्याप उमेदवार दिलेले नाहीत.
त्यातच सोमवारी सायंकाळी पक्षाकडून या मतदारसंघात बाहेरील पक्षाचा उमेदवार देणार असल्याची बातमी आल्याने पक्षातील सर्व इच्छुकांनी तातडीने भाजप पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष धीरज घाटे यांना बैठक घेण्यास भाग पाडले.
त्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व इच्छुकांंनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खडकवासला मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.





