कार्ला येथे आठवडे बाजारात झाड कोसळले; सहा जण जखमी, एक गंभीर

कार्ला – येथील आठवडे बाजारात झाड कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी आहे. कार्ला येथे दर शुक्रवारी आठवडे बाजार भरत असतो. यानिमित्त पंचक्रोशीतील भाजी व अन्य वस्तूंचे विक्रेते बाजारात येत असतात.
तर, खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकही येतात. शुक्रवारी जेव्हा आठवडे बाजार सुरु होता, तेव्हा दुपारच्या सुमारास अचानक आंब्याचे एक जुने झाड कोसळले. झाड कोसळल्याने सहा नागरिक जखमी झाले. उपस्थितांनी तात्काळ मदतकार्य करीत त्यांना रुग्णालयात दाखल केले.
कार्ला गावात गेल्या पंचवीस वर्षांपासून दर शुक्रवारी आठवडे बाजार भरत आहे. कार्ला-मळवली रस्त्यालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानावर हा बाजार भरतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे बाजार सुरु असताना दुपारी अचानक आंब्याचे जुने झाड वाळवी लागून पोकळ झाल्याने कोसळले.
या घटनेने तिथे असलेल्या भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दुर्घटनेत झाड अंगावर कोसळल्याने भीमा अनंता मावकर हे भाजी विक्रेते गंभीर जखमी झाले, तर अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले. तसेच दोन वाहनांचेही नुकसान झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सुदैवाने दुपारची वेळ असल्याने व बाजारात गर्दी नसल्याने मोठी हानी झाली नाही. परंतु यानिमित्ताने आठवडे बाजारासाठी सुरक्षित आणि पक्के बांधकाम असलेली जागा मिळणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.
तसेच या भागात अजूनही काही जुनाट झाडे असून ती देखील किड्यांनी पोखरून पडण्याच्या अवस्थेत असल्याने ती झाडे काढून टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत. सोबत अपघातात जखमी झालेल्यांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.





