PCMC : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ७,६०० कर्मचाऱ्यांना ७० कोटी रुपये बोनस
PCMC : किमान ६० हजार रुपये तर कमाल ३ लाख रुपये बोनस

पिंपरी – महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महापालिकेत वर्ग एक ते वर्ग चारचे एकूण ७ हजार ६०० अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांना यंदा ७० कोटी रुपयांचा बोनस देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना किमान ६० हजार रुपये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वाधिक तीन लाख रुपये बोनस मिळाला आहे.
कामगार आयुक्तांच्या सूचनेनुसार, महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ यांच्यात करार झाला आहे. दर पाच वर्षांनी करारनामा केला जातो. त्यानुसार महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जात आहे.
महापालिकेतील या दरवर्षीच्या प्रथेनुसार ८.३३ टक्के बोनस व २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा सानुग्रह अनुदानात पाच हजारांची वाढ करून ती रक्कम ३० हजार रुपये केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोनस दिला जातो.
त्यानुसार ६८ कोटी ९१ लाख रुपयांच्या बोनसचे वितरण करण्यात आले आहे. तर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, घंटागाडी कर्मचारी, सफाई कामगार यांना ३० हजार सानुग्रह अनुदान दिले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तीन लाख रुपये आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ६० हजार रुपये बोनस मिळतो.
त्यानुसार यंदा बोनसपोटी तब्बल ७० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच सानुग्रह अनुदानात वाढ झाल्याने यंदा महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्याचप्रमाणे यंदा दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे. शनिवारी (दि. ७) ते बुधवार (दि. ११) अशी सुट्टी असणार आहे.
सत्यवान उबाळे यांनी नाकारला बोनस
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी यावेळी बोनस नाकारला आहे. यापूर्वीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेश लांडे यांनीही बोनस घेतला नव्हता. तर याबाबत सत्यवान उबाळे म्हणाले की, यापूर्वी मी जेथे नोकरी केली आहे, त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही महापालिकेमध्ये कार्यरत असताना मी बोनस घेतला नव्हता.
यांनाही मिळतो बोनस
सहा महिन्यांपासून कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी, मानधनावरील अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी, समूह संघटक, तासिका तत्त्वावर नेमलेले कर्मचारी, निलंबित अधिकारी व कर्मचारी आणि गेल्या वर्षात निवृत्त कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जातो. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनाही महापालिकेकडून हिश्श्याच्या ४० टक्के प्रमाणात बोनस दिला आहे.





