माणच्या फौजीची यशस्वी “कॉम्रेड’ कामगिरी

सातारा -सतत नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी धडपडणारा अवलिया फौजी म्हणून ओळख असणारा व भारतीय सेनेत कार्यरत असलेला मलवडी (ता. माण) गावच्या राहुल जगदाळे याने दक्षिण आफ्रिकेतील 90 किलोमीटरची स्पर्धा 10 तास 10 मिनिटांत पूर्ण करुन यशाच्या शिखराला गवसणी घातली.
राहुल याने भारतीय सेनेत दाखल झाल्यानंतर माणचे सुपुत्र मॅरेथॉन धावक कौशल्य विकास विभागाचे सहआयुक्त नामदेव भोसले यांच्या प्रेरणेने मॅरेथॉन धावण्यास सुरूवात केली. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनने 2015 मध्ये हा प्रवास सुरु झाला. मुंबईत 2020 मध्ये बदली होऊन आल्यानंतर इंदूरचे विजय सुहानी यांनी 2019 मध्ये ‘कॉम्रेड’ पूर्ण केलेला अनुभववजा लेख वाचल्यानंतर आपणही कॉम्रेड केली पाहिजे असे त्याने ठरवले. एक दिवस नामदेव भोसले यांच्याबरोबर धावताना त्याने सहज हा विषय त्यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनीसुद्धा 2019 ला कॉम्रेड पूर्ण केलीय हे समजलं.
त्यानंतर सुरु झाला ‘कॉम्रेड’ चा प्रवास. श्री भोसले यांनी भारताचे पहिलेच जागतिक दर्जाचे धावक, मार्गदर्शक सतीश गुजराण ज्यांनी ही कॉम्रेड मॅरेथॉन सलग दहावेळा पूर्ण केलेली आहे. त्यांच्याकडे राहुलला प्रशिक्षणासाठी पाठवलं. मार्च 2021 पासून प्रशिक्षणास सुरुवात झाली. राहुल किमान 1300 किलोमीटर अंतर 6 महिन्यात धावला. यामध्ये लोणावळा हिल रन 50 किलोमीटर, सातारा हिल रन 56 किलोमीटर आणि लवासा हिल रन 65 किलोमीटर यांचा समावेश होता. अनेक अडथळ्यांवर मात करत दहा तासांपर्यंत मॅरेथॉन पूर्ण करुन राहुल हा कास्य पदकाचा मानकरी ठरला.
अंतिम रेषेवर पोहचल्यावर झालेला आनंद शब्दात सांगूच शकत नाही. मी केव्हाच ऊन, वारा, पाऊस याचा विचार केला नाही. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला तयार करून घेतलं. त्याचीच ही फलप्राप्ती आणि स्वप्नपूर्ती आहे. मी एवढंच सांगेन की आपणाला जे क्षेत्र आवडतं त्यात स्वतःला पूर्ण झोकून देऊन मनापासून प्रयत्न करत राहिलं तर त्या क्षेत्रातील सर्वोच्च शिखरावर पोहचायला कोणीच अडवू शकत नाही.
– राहुल जगदाळे (हवालदार, भारतीय सेना)





