कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनीचा मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

RG Kar Medical College :कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल गेल्याकाही महिन्यांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी कॉलेजमधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. हे कॉलेज आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून, येथील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी 20 वर्षीय विद्यार्थीनी मृत अवस्थेत आढळली आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची विद्यार्थीनी असलेली ही तरूणी कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळली. या विद्यार्थीनीची आई सुद्धा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. तर वडील मुंबईतील एका बँकेत अधिकारी आहेत.
आईने वारंवार फोन करूनही मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी विद्यार्थीनी मृतावस्थेत आढळली. रिपोर्टनुसार, रात्री विद्यार्थीनी तिच्या खोलीत होती. आईने तिला अनेकदा आवाज दिला व दार ठोठावले, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी तरूणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. शेजाऱ्यांच्या मदतीने आईने मुलीला खाली घेतले व त्यानंतर तिला जवळच्या कामरहाटी येथील ईएसआय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ही विद्यार्थिनी आजाराने ग्रस्त होती, ज्यामुळे ती नैराश्यात होती असे सांगितले जात आहे.पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेत कोणतीही सुसाइट नोट सापडलेली नाही. तसेच, कुटुंबाकडूनही कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आरजी कर मेडिकल कॉलेजच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळला होता. या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून आत्महत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील केले होते. या घटनेतील आरोपी संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआय मृत्युदंडाची शिक्षा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.


