मुंबई : सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या युतीने उलथवून लावली आहे. या निवडणुकीत भाजपने 89 जागांवर विजय मिळवला असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्याने भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, या स्पष्ट संख्याबळाच्या पार्श्वभूमीवरही उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा महापौरपदाच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. आज मातोश्रीवर नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. “ते आमची शिवसेना कागदावर संपवू शकतात, पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाहीत. उलट त्यांची शिवसेना फक्त कागदावरच उरली आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच साम-दाम-दंड-भेद वापरून आमिषे दाखवली गेली, यंत्रणांचा गैरवापर करून गद्दारी विकत घेतली गेली, पण निष्ठा विकत घेता येत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट महापौरपदावर भाष्य करत मोठं विधान केलं. “मुंबईत आपलाच महापौर व्हावा हे आमचं स्वप्न आहेच. बघू, देवाच्या मनात असेल तर तेही होईल. आकडा गाठता आला नाही कारण त्यांनी गद्दारी करून विजय मिळवला. हा विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी मिळवलेला आहे. या पापाला मुंबईकर आणि मराठी माणूस कधीच माफ करणार नाही,” असं ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धडधड वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण निकालानंतर शिंदे गटाने निवडून आलेल्या नगरसेवकांना एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सत्तास्थापनेपर्यंत नवनिर्वाचित नगरसेवकांना एकत्र ठेवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे “शिंदेंना ठाकरेंची धास्ती लागली आहे का?” असा सवाल उपस्थित होत असून, मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेपूर्वी राजकीय हालचाली अधिकच वेगाने घडताना दिसत आहेत.