पुणे -करोना संकटामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट असण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्या अनुषंगाने सर्वांना परवडेल अशी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला असून, कर्करोगावर उपचार करणारे स्वतंत्र रुग्णालय आता पुणे शहरामध्ये उभारण्यात येत आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांना या रुग्णालयाचा लाभ होणार आहे.
कर्करोगावरील उपचार खर्चिक असतात आणि ते दीर्घकाळ चालतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च परवडत नाही. मुंबईमध्ये “टाटा मेमोरियल रुग्णालया’मध्ये कर्करुग्णांवर उपचार केले जातात. अशा धर्तीचे आणखी एक रुग्णालय पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आवश्यक होते. त्या दिशेने आता पुणे महापालिकेने ठोस पाऊल टाकले आहे. बाणेर भागात दहा हजार चौरस मीटरहून अधिक जागेत “भारतरत्न नानाजी देशमुख कर्करोग रुग्णालय’ उभारण्याचा प्रस्ताव महापालिका तयार करत आहे. त्यासाठी अपेक्षित कार्यप्रणालीनुसार प्रस्ताव मागवले जाणार आहेत. या कामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिद्ध “वामेड’ कंपनीचे सहकार्य महापालिकेला लाभणार आहे.
पुण्यात कर्करोग रुग्णालय सुरू करण्यासाठी जवळपास 900 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही “वामेड’ने तत्त्वत: मान्यता दर्शवली असून, तसे पत्रही महापालिकेला पाठवले आहे. आरोग्य क्षेत्रातील सुविधा अधिक भक्कम, कार्यक्षम आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली आहे. याशिवाय आरोग्य क्षेत्रासंदर्भातील विविध योजना वेगाने मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी या कामांवर लक्ष ठेवून आहेत.
“भारतरत्न नानाजी देशमुख कर्करोग रुग्णालया’चे मूलभूत काम येत्या सहा ते नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. यासाठी 2021-22 साठीच्या अर्थसंकल्पामध्ये एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या काही महिन्यांत या रुग्णालयाचे भूमिपूजन केले जाईल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये सध्या मुंबईतील “टाटा मेमोरियल रुग्णालय’, नागपूरमधील “राष्ट्रसंत तुकडोजी विभागीय कर्करोग रुग्णालय’ आणि औरंगाबादमधील “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)’ या तीन ठिकाणी सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोगावरील उपचार केले जातात. यामध्ये आता पुण्यातील “भारतरत्न नानाजी देशमुख कर्करोग रुग्णालयाचा’ही समावेश होणार आहे.
“वामेड’चे मोलाचे साहाय्य
ऑस्ट्रियामध्ये मुख्यालय असलेल्या “वामेड’ या आरोग्यक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरात एक हजारांहून अधिक रुग्णालये उभारली आहेत. तसेच दोन लाखांहून अधिक खाटांचे व्यवस्थापन “वामेड’मार्फत केले जाते. जगभरातील 95 देशांत “वामेड’चे एक हजाराहून अधिक वैद्यकीय प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू आहेत. विशेष म्हणजे, “वामेड’चा हा भारतात पहिलाच वैद्यकीय प्रकल्प असेल.
कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्यावरील दीर्घकालीन उपचार आणि सर्वसामान्यांना न परवडणारा खर्च, या पार्श्वभूमीवर पुण्यात अद्ययावत कर्करोग रुग्णालय उभारण्याचा आमचा निर्धार आहे. भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने उभे राहणारे हे रुग्णालय पुणेकरांसाठी वरदान ठरेल.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा