कोथरूडमध्ये भरधाव ‘थार’ची पाच दुचाकींना धडक, चालक फरार

पुणे : कोथरूडमधील निंबाळकर चौकात युफोरिया बाय खेळीया या दुकानासमोर रविवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या थार (MH 12 UN 1306) गाडीने पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात हिरो अॅक्टीव्हा, विस्पा VXL, टीव्हीएस ज्युपिटर, आणखी एक अॅक्टीव्हा आणि यामाहा या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
दुकानाचे मालक विश्वेष विजय देशपांडे (वय ४१) यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. देशपांडे म्हणाले, “अपघाताच्या वेळी मी दुकानात होतो. जोरदार आवाजानंतर बाहेर पाहिले तेव्हा दुचाकींचे नुकसान दिसले. चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले, त्याने होकार दिला, पण काही क्षणांतच तो गाडी घेऊन पळाला.”
अपघातामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.





