satara | दुर्गम अंबवडेत पेटणार निर्धूर चूली

मेढा, (प्रतिनिधी) – दुर्गम अंबवडेत आता पर्यावरणस्नेही निर्धूर चुली पेटणार असून इनरव्हील क्लब ऑफ कराड च्या या उपक्रमामुळे लाकडाच्या धुराचे प्रदूषण थांबणार असून पर्यावरणीय चळवळ बळकट होण्यास मदत होणार आहे. इनरव्हील क्लबच्या या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, इनरव्हील क्लब ने अंबवडे येथील महिलांना घरघंटीचे देखील वाटप केल्याने ग्रामस्थांची आठ किलोमीटरची पायपीट थांबण्यास मदत होणार आहे. घरघंटीमुळे महिलांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील दुर्गम असणारे अंबवडे (ता. जावळी) हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वसले आहे. याठिकाणी १८ कुटुंबे वास्तव्यास असून त्यांना दळणासाठी आठ किलोमीटरची पायपीट करून अंधारी गाठावी लागत होती. दुर्गम अंबवडेत इनरव्हील क्लब ने हा उपक्रम राबविल्यामुळे ग्रामस्थांचा कित्येक वर्षांचा संघर्ष संपला आहे.दरम्यान ग्रामस्थांची पायपीट थांबणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान तरळले होते.
याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ कराड च्या अध्यक्षा सीमा पुरोहित, खजिनदार शितल शाह, आयएसओ अनुराधा टकले, सदस्या अस्मिता फासे, वैशाली पालकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कराड शहरातील नामवंत नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल फासे, डॉ.अस्मिता फासे, डॉ.आनंद गुडूर, प्रबोध पुरोहित यांनी घरघंटी करिता इनरव्हील क्लब ऑफ कराडला विशेष सहकार्य केले.
मुठभर काटक्यांवर संपूर्ण स्वयंपाक
निर्धूर चूल उपक्रमामुळे अंबवडेतील महिलांची महागड्या गॅस व रॉकेलच्या खर्चापासून कायमची सुटका होणार असून आता मुठभर काटक्यांवर संपूर्ण घरगुती स्वयंपाक बनवता येणार आहे.
लाकडाच्या धुराचे प्रदूषण थांबणार..
लाकडाच्या धुराचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षणीय आहे. लाकडाच्या धुराचे वायू प्रदूषण हे कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड, अस्थिर सेंद्रिय संयुगे आणि सूक्ष्म कणांसह प्रदूषकांचे जटिल मिश्रण उत्सर्जित करते. आता मात्र इनरव्हील च्या या उपक्रमामुळे निर्धूर चुली पेटणार असल्याने लाकडाचे प्रदूषण थांबण्यास मदत होणार आहे.





