Dhindora Series : एकाच अभिनेत्याने साकारली तब्बल ९ पात्रं! ५०० मिलियन व्ह्यूजचा विक्रम करणारी ‘ढिंढोरा’ परतणार, यावेळी थेट Netflix वर
Dhindora Series ‘ढिंढोरा’चा पहिला सीझन २०२१ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झाला होता. मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची साथ नसतानाही या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. या शोला तब्बल ५०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.

Dhindora Series : ‘BB Ki Vines’मधून लोकप्रिय झालेला अभिनेता आणि डिजिटल क्रिएटर भुवन बाम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची गाजलेली वेब सीरिज ‘ढिंढोरा’ आता दुसऱ्या सीझनसह परतणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सीझनप्रमाणे यावेळीही भुवन बाम मुख्य भूमिकेत असणार असून ‘ढिंढोरा २’ थेट Netflix या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यूट्यूबवर गाजली होती ‘ढिंढोरा’
‘ढिंढोरा’चा पहिला सीझन २०२१ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झाला होता. मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची साथ नसतानाही या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. या शोला तब्बल ५०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले. त्यामुळे भारतीय डिजिटल विश्वातील लोकप्रिय स्वतंत्र निर्मितींपैकी एक म्हणून ‘ढिंढोरा’ची ओळख निर्माण झाली.
पहिल्या सीझनमध्ये एकूण ९ एपिसोड होते. कॉमेडी, ड्रामा, सस्पेन्स आणि भावनिक प्रसंग यांचा सुरेख मेळ या सीरिजमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला मोठी पसंती दिली.
एका अभिनेत्याने साकारली ९ पात्रं
‘ढिंढोरा’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भुवन बामचा मल्टी-रोल परफॉर्मन्स. या सीरिजमध्ये त्याने तब्बल ९ वेगवेगळी पात्रे साकारली होती. भुवनने बबलू, जानकी, बंचोदास म्हणजेच बंचो, समीर फुद्दी, टीटू मामा, बबली गुप्ता, मकुन प्रसाद होला आणि डिटेक्टिव्ह मंगलू यांसारख्या भूमिका साकारल्या. या सर्व पात्रांना त्याने वेगवेगळ्या पद्धतीने सादर केल्यामुळे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले गेले.

Dhindora Series
नेमकी काय आहे ‘ढिंढोरा’ची कथा?
‘ढिंढोरा’ची कथा एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. भुवनने साकारलेल्या बबलू या पात्राला अचानक लॉटरी लागते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित आणि मजेशीर घटना घडू लागतात.
लॉटरी लागल्यानंतर आयुष्य बदलण्याऐवजी बबलू आणि त्याच्या कुटुंबासमोर एकापाठोपाठ एक नवनवीन समस्या उभ्या राहतात. या घटनांमधून विनोदासोबतच सस्पेन्स आणि भावनिक प्रसंगही पाहायला मिळतात.
या सीरिजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘BB Ki Vines’मधील भुवनची लोकप्रिय पात्रे एका काल्पनिक दुनियेत एकत्र आणण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा शो खास ठरला.
आता ‘ढिंढोरा २’ची उत्सुकता
पहिल्या सीझनला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर ‘ढिंढोरा २’ची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. २०२६ मध्ये भुवन बामने या सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे वृत्त आहे. पहिल्या सीझनचे दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केले होते, तर कथा भुवन बामने लिहिली होती. दुसऱ्या सीझनमध्येही प्रेक्षकांना विनोद आणि मनोरंजनाचा तडका पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, पहिला सीझन यूट्यूबवर मोफत उपलब्ध होता. मात्र, आता ‘ढिंढोरा २’ थेट Netflix वर येणार असल्यामुळे या सीरिजचा आवाका आणखी मोठा होण्याची शक्यता आहे.
भुवन बामचा ओटीटी प्रवास
भुवन बामने आपल्या करिअरची सुरुवात ‘BB Ki Vines’ या यूट्यूब चॅनेलपासून केली. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि विनोदी व्हिडीओमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अभिनयाच्या क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली.
‘ताजा खबर’, ‘रफ्ता रफ्ता’ आणि ‘टेकाशी कॅसल’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये त्याने काम केले आहे. आता ‘ढिंढोरा २’मुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे.





