Baramati News : टी.सी. कॉलेजसाठी मिनी बसचा ‘शॉर्टकट’! भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांची आगारप्रमुखांकडे धाव
Baramati News : दररोज सकाळी महाविद्यालयाकडे जाताना आणि दुपारी-सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानक परिसरात मोठी गर्दी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचा अपव्यय, गर्दी आणि प्रवासातील गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सोलनकर यांनी निदर्शनास आणून दिले.

बारामती : बारामती बस स्थानक ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (टी.सी. कॉलेज) या मार्गावर विद्यार्थ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता महाविद्यालयीन वेळेनुसार स्वतंत्र मिनी बस सेवा सुरू करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बारामती आगारप्रमुख दुबल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
टी.सी. कॉलेजमध्ये बारामतीसह आसपासच्या ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. दररोज सकाळी महाविद्यालयाकडे जाताना आणि दुपारी-सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानक परिसरात मोठी गर्दी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचा अपव्यय, गर्दी आणि प्रवासातील गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सोलनकर यांनी निदर्शनास आणून दिले.
विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर व्हावा, यासाठी सकाळी महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळेत विशेष फेऱ्या तसेच दुपारी आणि सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर पुरेशा परतीच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना एसटीच्या उपलब्ध सवलतींचा लाभ मिळावा आणि प्रवासी संख्या वाढल्यास भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली.
“हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून हजारो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित मुद्दा आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि वेळ लक्षात घेऊन एसटी महामंडळाने टी.सी. कॉलेज मार्गावर मिनी बस सेवा तातडीने सुरू करावी,” अशी आग्रही मागणी सोलनकर यांनी केली.
युवक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा
आगारप्रमुख दुबल यांनी मागणीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बारामती तालुक्यातील विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विवेक साळुंके, उपाध्यक्ष संदीप केसकर आणि शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर उपस्थित होते.





