प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी (खुर्चीत बसण्यापूर्वी) शहराच्या कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत नगरसेवक योगेश जगताप होते. येथील कचरा डेपोची अवस्था आणि धोकादायक पद्धतीने अतिउच्चदाबाच्या वाहिनीखालीओल्या व सुक्या कचऱ्याचा झालेला डोंगर त्यातून सुटलेली दुर्गंधी अशी अवस्था पाहून बारभाई यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता ठेकेदार गोपाळ मोहोरकर यांना खडे बोल सुनावले. जेजुरी शहराच्या इशान्य दिशेला कचरा डेपो निर्माण करण्यात आला असून मागील काळात बायोमायनिंग प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र,हा प्रकल्प केवळ कागदोपत्रीच आहे. स्वच्छता ठेकेदाराकडून ओला व सुका कचरा विलग न करता एकत्रितरित्या डेपोमध्ये साठवला जातो. सर्वात गंभीर बाब म्हणजे अतिउच्च वीजवाहिनीच्या खाली साठवलेला कचरा काही काळानंतर तो पेटवला जातो. त्यामुळे मोठे प्रदूषण निर्माण होऊन येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली तीन वर्षांपासून येथे प्रशासकीय कालावधीमध्ये तर पुरता मनमानी कारभार झाला आहे. शहर स्वच्छता व कचरा संकलित करून डंपिंग करण्यापोटी सुमारे २ कोटीहून अधिक रक्कमेच्या या ठेक्यात बरेच काही दडलेले असून पुढील काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू देणार नाही. कचरा डेपो शहराच्या बाहेर विस्तीर्ण जागेत शासन नियमानुसार हलविण्यात येऊन बायोमायानिंग प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बारभाई यांनी सांगितले. कचऱ्यात आढळल्या नगरपरिषदेतील खुर्च्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी बारभाई यांनी कचऱ्यावर ठाण मांडत ठेकेदाराला खडेबोल सुनावत या प्रकल्पाचा पंचनामा करताना येथील कचऱ्यात मागील काळातील नगराध्यक्ष पदाची व नगरसेवकांची खुर्ची आढळून आली. काही वर्षांपूर्वी हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या खुर्च्या अक्षरशः कचरा डेपोत पाहून सर्वजण अचंबित झाले.