Pimpri : प्रभागरचनेत पालकमंत्र्यांनाच धक्का?

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. सन २०१७ प्रमाणे प्रभागरचना ठेवण्याचे आदेश असताना तसेच प्रारुप प्रभागरचना त्याचपद्धतीने केलेली असताना अंतिम रचनेत मात्र, प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यातून शिंदेसेनेच्या खासदारांच्या घरातील जागा सुरक्षित करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकल्याने आरक्षण बदलणार आहे. त्याचा फायदा गतवेळच्या निवडणुकीमध्ये अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या उमेदवारांना होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसणार आहे. त्यामुळे अंतिम रचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक मानली जात आहे, तर भाजप आणि शिंदेसेनेसाठी फायद्याची ठरणार आहे.
महापालिका निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे. सुरुवातीपासून महापालिकेच्या निवडणूक विभागाने सन २०१७ प्रमाणेच प्रभागरचना होणार असल्याचा सूर आळवला होता. त्यामध्ये कोणताही बदल न करता प्रशासनाने प्रभागरचना प्रसिद्ध केली. त्यावर मुदतीमध्ये ३१८ हरकती घेण्यात आल्या. माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पदाधिकार्यांनी या रचनेवर हरकती घेतल्या.
मात्र, त्यांच्या हरकती मान्य न करता भाजप आणि शिंदेसेनेच्या पदाधिकार्यांनी घेतलेल्या हरकती मान्य करण्यात आल्या. खासदार श्रीरंग बारणे यांच्या क्षेत्रातील पदमजी पेपर मिल, गणेशनगर प्रभाग २४ मध्ये मागीलवेळी चारपैकी एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव होती. यातून शिवसेनेचे सचिन भोसले निवडून आले होते. पुढे ते ठाकरे गटाचे शहराध्यक्ष झाले. आता यातील म्हातोबा वस्ती हा परिसर प्रभाग २५ वाकडला जोडला आहे. त्यामुळे या प्रभागातील अनुसूचित जातीची मतदारसंख्या कमी होणार आहे.
परिणामी या गटाचे आरक्षण राहणार नाही. तसेच सचिन भोसले यांना याठिकाणाहून उभे राहण्यासाठी अडचण येणार आहे. असे असताना खासदार बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे व पुतणे नीलेश बारणे यांच्यासाठी मात्र हा प्रभाग सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे प्रभागरचनेत खासदारांनी आपल्या घरातीलच जागा सुरक्षित करून घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे भोसरी मतदारसंघात प्रारूप प्रभाग रचनेत पूर्वी तळवडे प्रभागात असलेला ताम्हाणे वस्ती हा भाग चिखलीला जोडलेला आहे. सन २०१७ मध्ये तळवडेतून राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग सहामधील गावजत्रा मैदान आणि महापालिका रुग्णालय हा भाग भोसरी गावठाणात जोडला आहे. या प्रभागातील अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटासाठी संधी निर्माण झाली आहे.
प्रभाग ६ धावडेवस्तीचा एसटी आरक्षण प्रभाग २९ मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले राष्ट्रवादीच्या तीन माजी नगरसेवकांवर परिणाम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी हरकती घेऊन देखील त्यांच्या हरकती मान्य करण्यात आल्या नाहीत. मात्र, भाजप व शिंदेसेनेसाठी अनुकूल असलेल्या ठिकाणी प्रभाग फोडण्यात आले. त्यामुळे अंतिम प्रभागरचनेवर सत्ताधारी पक्षाची पकड असली तरी प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीला सोयीस्कररित्या अडचण केली आहे. परिणामी, प्रभागरचनेबाबत राजा बोले दल हले…अशी परिस्थिती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हॉटेलमधील बैठकीने सूत्रे हलली?
दरम्यान, प्रारुप प्रभागरचनेवर हरकती आल्यानंतर निवडणूक अधिकार्याने भाजप आमदारासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेतली होती. सायंकाळी पाच ते पावणेसहा या ४५ मनिटांच्या बैठकीमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. याचठिकाणी कोणत्या हरकती स्वीकारायच्या व कोणत्या नाही याची चर्चा झाली असल्याचे वृत्त समोर आले होते. आता अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर या बैठकीतच सूत्रे हलली असल्याची शक्यता विरोधक वर्तवत आहेत.





