पुणे जिल्हा | विधानसभेपूर्वी आमदार मोहितेंना धक्का

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले असून आमदार मोहिते पाटील विरोधकांनी बाजी मारली आहे. सभापतिपदी विजय शिंदे, उपसभापतिपदी क्रांती सोमवंशी बिनविरोध झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सभापती, उपसभापती यांच्या निवडीच्या घोषणे नंतर शिंदे, सोमवंशी समर्थक आणि आमदार मोहिते पाटील विरोधकांनी बाजार समिती आवारात मोठा जल्लोष केला.
आमदार मोहिते पाटील समर्थक असलेल्या समितीचे मावळते सभापती कैलास लिंभोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामा दिला होता.
त्यानंतर दि. 28 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती; मात्र आमदार मोहिते पाटील यांच्या तीन समर्थकांनी बंडखोरी करून विरोधकांना साथ देण्याचे ठरवले. 10 विरोधात 8 संचालक झाले. विरोधी 10 संचालक अज्ञातस्थळी सहलीला गेले.
संचालक विरोधात गेल्याने पणन मंत्रालयाद्वारे आमदार मोहिते पाटील यांनी दि. 28 सप्टेंबरला होणारी निवडणुकीला अगोदरच्या सायंकाळी स्थगिती मिळवली होती. यावरून विरोधक त्यावेळी तोंडघशी पडले होते. त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन गुरुवारी (दि. 10) निवडणूक लावली होती.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
वादाच्या पार्श्वभूमीवर आणि तापलेल्या राजकीय वातावरणात निवडणूक होणार असल्याने बाजार समिती आवारात 12 अधिकारी आणि 100 पोलीस असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
आमदार मोहिते पाटील यांच्या विरोधात तयारीत असलेले विधानसभा इच्छुक, त्यांचे समर्थक आणि तालुक्यातील नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीत तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या तालुक्यातील सर्व पक्षीय विरोधकांनी सत्ता काबीज केली.
नानासाहेब टाकळकर, हिरामण सातकर, अनिल बाबा राक्षे, अतुल देशमुख, सुधिर मुंगसे,भगवान पोखरकर, अमोल पवार, बाबाजी काळे, अशोक खांडेभराड, संजय घनवट,अमर शिंदे यांच्या सह अनेकानी निवडणुक प्रक्रिये पूर्वीच्या राजकिय डाव पेच डावात यशस्वी सहभाग घेतला.
आमदार मोहितेंची निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे टाळले
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवडणुक प्रक्रियेत सहभागी होणे टाळले, माजी सभापती कैलास लिंभोरे, माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, रणजित गाडे, जयसिंग भोगाडे, पप्पु टोपे हे प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी उपस्थित होते.
त्यांनी या निवडणुकी संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. यामुळे आम्ही प्रक्रियेत सहभागी होत नाही असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांच्याकडे दाखल केला. सभेच्या नोंदवहीत सही न करता सर्वांनी सभागृह सोडले.





