विशेष : खगोलप्रेमी जीवनव्रती….

डॉ. जयंत नारळीकर यांना आज 86 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून एक वैज्ञानिक, एक विज्ञानलेखक, एक विज्ञानप्रसारक अशा तिहेरी योगदानावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.
19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या जयंत नारळीकर यांना घरातूनच विद्वत्तेचा वारसा लाभला. वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रख्यात गणितज्ञ होते तर आई सुमती या (माहेरचे नाव कृष्णा शंकर हुजूरबाजार) संस्कृतच्या स्कॉलर होत्या. बनारस हिंदू विद्यापीठातून 1957 मध्ये बीएस्सी पदवी घेतल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. 1959 मध्ये केंब्रिज विद्यापीठाची ‘ट्रायपास’ ही गणितातील अवघड परीक्षा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पास होऊन वडिलांप्रमाणे ते रँगलर झाले. यानंतर त्यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व उत्पत्तीसंबंधी संशोधन करून सिद्धांत मांडला (1963). ‘अंतर्गत स्फोट होऊन सूर्यापासून पृथ्वी आणि इतर ग्रह निर्माण झाले’ हा त्यांच्या सिद्धांताचा मुख्य आशय. त्यानंतर 1972 पर्यंत तेथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रॉनॉमी’मध्ये संशोधनकार्य केले.
आपल्या संशोधनाचा आपल्या देशाला उपयोग व्हावा म्हणून ते 1972 मध्ये भारतात परतले व मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेत दाखल झाले. तेथे ते अनेक मानाची व जबाबदारीची पदे भूषवित 1989 पर्यंत कार्यरत राहिले. याचवेळी त्यांनी पुणे विद्यापीठात ‘आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनोमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) या खगोलशास्त्रातील प्रगत अध्ययन केंद्राची अथक परिश्रमातून उभारणी केली. खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या विषयांचे ही संस्था मार्गदर्शन करते. अंतराळातील ग्रह, तारे, नक्षत्रे यांची माहिती देण्यासाठी डॉ. नारळीकरांनी आकाशदर्शनाचे कार्यक्रम घडवून आणले. खगोलशास्त्रातील अनेक अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा तसेच अनेक दुर्मिळ ग्रंथ व अद्ययावत नियतकालिके येथे उपलब्ध आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा म्हणून व्याख्यानमाला, कार्यशाळा, विद्यार्थ्यांची सुट्टीतील शिबिरे आदी उपक्रम आयुका राबविते.
1966 मध्ये मंगला सदाशिव राजवाडे या विदुषीने डॉ. नारळीकरांच्या आयुष्यात प्रवेश केला. मंगला यांनी मुंबई विद्यापीठाची गणित विषयातील पीएच.डी. प्राप्त केली होती. गणित व संशोधन हे दोघांच्याही आवडीचे विषय असल्याने आयुष्याचे गणित सोपे झाले. दोघांचा संसार बहरला आणि त्या संसारवेलीवर गीता, गिरीजा आणि लीलावती ही तीन कन्यारत्ने उमलली. संसार बहरत असतानाच डॉ. नारळीकरांचे संशोधन कार्यही विस्तारत गेले.
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत : डॉ. नारळीकरांचे जगभर गाजलेले संशोधन म्हणजे त्यांनी डॉ. हॉएल समवेत मांडलेला गुरुत्वाकर्षण सिद्धांत होय. वेग हा सापेक्ष आहे, याची जाणीव आइन्स्टाइनच्याही पूर्वी गॅलिलिओ, न्यूटन, माख यांना होती. वेगाला अर्थ देणार्या विशिष्ट पार्श्वभूमीवर न्यूटन, माख यांनी मते मांडली आहेत. न्यूटनच्या मते, ही पार्श्वभूमी म्हणजे निरपेक्ष अवकाश. मात्र तो याचे अस्तित्व सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे निरपेक्ष अवकाशाची कल्पना खरी की खोटी यावर शास्त्रज्ञांमध्ये मतभेद होत राहिले. यावर ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ माख याने उत्तर शोधले. बॅले नर्तिकेच्या उदाहरणाद्वारे विश्वात निरपेक्ष अवकाश असे काही नसते व ग्रहतार्यांचे वस्तुमानच गतिनिश्चितीस पार्श्चभूमी पुरवीत असल्याचा सिद्धांत माखने मांडला. मात्र, माखला हे गणितीय पद्धतीने सिद्ध करता आले नाही.
माखच्या सिद्धांताचे गणितीय विश्लेषण डॉ. नारळीकरांनी आपले गुरू डॉ. हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली केले. ‘जर विश्वात एकच कण असेल तर त्याला वस्तुमान असणार नाही. पण आणखी एक दुसरा कण निर्माण झाला तर दोन्ही कण एकमेकांना वस्तुमान पुरवतील’ हा त्यांनी यासंदर्भात मांडलेला सिद्धांत. या सिद्धांताच्या आधारे विश्वातील प्रत्येक वस्तूची निर्मिती व अंत सांगता येतो. त्यामुळे आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या समीकरणांपेक्षा डॉ. नारळीकरांची समीकरणे प्रभावी ठरतात. या सिद्धांताचे गणितीय सूत्र इतके किचकट आहे की, 1964 साली जेव्हा रॉयल सोसायटीच्या सभागृहात उपस्थित शास्त्रज्ञांसमोर मांडले तेव्हा फारच थोड्या जणांना त्याचे आकलन झाले. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हा ज्ञानाच्या क्षेत्रातील महान पराक्रम केल्याने डॉ. नारळीकरांची गणना जगातील थोर खगोलशास्त्रज्ञांमध्ये केली जाऊ लागली.
स्थिरवत विश्वस्थितीचा सिद्धांत : विश्व हे एका मोठ्या स्फोटाने निर्माण झाले, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. 1948 साली बॉन्डी, गोल्ड व हॉएल यांनी स्थिर विश्वस्थितीचा सिद्धांत मांडला. तो असा, विश्व हे अनादी व अनंत आहे. अपरिवर्तनशील आहे. मोठ्या कालावधीचा विचार केला तर विश्व हे स्थिर असते. पण लहान कालावधीचा विचार करता त्याच्या घटकात बदल होत असतो. त्यानंतर डॉ. नारळीकर, हॉएल व बर्बीज यांनी नवा स्थिरवत विश्वस्थिती सिद्धांत मांडला. त्यानुसार मोठ्या कालावधीचा विचार केला तर विश्व हे सतत प्रसरण पावत असते. पण लहान कालावधीचा विचार करता विश्व हे सतत आकुंचन-प्रसरण पावत असते. डॉ. नारळीकरांच्या या सिद्धांताने महास्फोट सिद्धांताला मोठे आव्हान दिले आहे.
विज्ञानविषयक साहित्य निर्मिती : आयुका संस्थेमार्फत चालणार्या अनेक प्रयोगांना डॉ. नारळीकर मार्गदर्शन करतात. ‘अवकाशातील धूमकेतूच्या शेपटीमधून अनेक रोगजंतू पृथ्वीवर येतात’ या हॉएल-विक्रमसिंह सिद्धांताला पुष्टी देणारा प्रयोग आयुकातर्फे केला गेला आहे. वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित कथा लिहून त्यांनी विज्ञानाविषयी सर्वसामान्य माणसांमध्ये आवड निर्माण केली. ‘आकाशाशी जडले नाते’ ही ग्रंथरचना त्यांनी अत्यंत लालित्यपूर्ण भाषेत केली आहे. डॉ. नारळीकर हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. फलज्योतिष, पुराणकथांतील विज्ञानाच्या भाकडकथा आदी अंधश्रद्धा पसरविणार्या गोष्टींवर त्यांनी आपल्या लिखाणातून टीका केली. लेखन व व्याख्यान याद्वारे ते समाजाचे प्रबोधन करतात. विद्यापीठातून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू करण्यास त्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे अंधश्रद्धेला उत्तेजन मिळेल असे त्यांचे मत होते.
केंब्रिजमध्ये शिकत असतानाच टायसन पदक, स्मिथ पारितोषिक, अॅडम्स पारितोषिक डॉ. नारळीकरांनी मिळविले. त्यांचा देश-विदेशात अनेक सन्मानांनी गौरव केला आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, बी.एम. बिर्ला पुरस्कार, फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार, कोल्हापूरचा राजर्षी शाहू पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार आदी असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (1965), पद्मविभूषण (2004) पुरस्काराने तर राष्ट्रीय विज्ञान संस्थेने इंदिरा गांधी पुरस्काराने (1990) सन्मानित केले आहे. 1996 मध्ये त्यांना युनोस्कोचा ‘कलिंग पुरस्कार’ तर 2004 मध्ये फ्रेंच सरकारचा खगोलशास्त्रातील ‘प्रिक्स जोन्सन’ हा पुरस्कार प्रदान केला.





