सातारा – राज्याचा मदत व पुनर्वसन विभाग आणि सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित ‘एक धाव सुरक्षेची’ या उपक्रमांतर्गत सातारा येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी उत्साहात झाली. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात केली. आपत्तींसंदर्भात युवक व युवतींमध्ये जागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जकातवाडी येथील यशवंतराव स्कूल ऑफ सोशल सायन्स, सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील एनसीसीचे विद्यार्थी, होमगार्ड, आ. शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे सदस्य, जिल्हा प्रशासनातील कर्मचारी, मॉर्निंग ग्रुप, विरंगुळा ग्रुपच्या सदस्यांनी भाग घेतला. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल सायन्सचे प्रा. जीवन बोराटे, छत्रपती शिवाजी कॉलेजच्या एनसीसी विभागाचे कॅप्टन पवार, होमगार्ड विभागाचे केंद्रनायक तुषार वरांडे, आ. शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे अध्यक्ष चंद्रसेन पवार उपस्थित होते. प्रथम तीन विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.