अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दिलासा

पुणे – बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी खरेदी केलेल्या मावळ तालुक्यातील जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याच्या मागणीसाठी मूळ मालकांच्या नातवांनी केलेला दावा वडगाव मावळ दिवाणी न्यायालयाने फेटाळला. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश राहुल शिंदे यांनी हा आदेश दिला.
मावळ तालुक्यात असलेल्या या जमिनीचे खरेदीदार धर्मेंद्र देओल, हेमा मालिनी यांच्यासह श्रीकांत खिरे यांच्याविरोधात जमिनीच्या मूळ मालकाचे नातू किसन मानकर यांनी दावा दाखल केला. या खटल्यात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या वतीने ॲड. अमित राठी, ॲड. राजू शिंदे आणि ॲड. आदित्य जाधव यांनी बाजू मांडली.
ही जमीन खिरे यांनी १९८५ मध्ये धर्मेंद्र व हेमा मालिनी यांना विकली होती. त्यानंतर जमिनीचे मूळ मालक मानकर यांच्या नातूने ही मालमत्ता वडिलोपार्जित असल्याने त्याचे खरेदीखत रद्द करण्यासाठी २०२२ मध्ये न्यायालयात दावा दाखल केला. परंतु, हा दावा कालबाह्य असल्याचा अर्ज धर्मेंद्र व हेमामालिनी यांच्या वतीने ॲड. अमित राठी यांनी न्यायालयासमोर दाखल केला. जमिनीच्या मूळ मालकांना १९८५ मध्ये जमिनीच्या खरेदीखताची माहिती असतानाही, त्यांनी कालमर्यादेत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अवलंबली नाही.
आता, ३७ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यावर ‘सेलिब्रिटीं’कडून पैसे हडपण्याच्या सूडबुद्धीने हा खोटा दावा दाखल केला, असा युक्तिवाद ॲड. राठी यांनी केला. जमिनीच्या मूळ मालकांचे नातू मानकर यांच्या वकीलांनीही युक्तिवाद केला. खिरे यांनी ही जमीन वसंत मानकर, शिवाजी मानकर आणि यमुनाबाई जांभूळकर यांच्याकडून १२ जून १९८५ रोजी खरेदी केली.
या जमिनीचा आणखी एक विक्री करार खिरे यांच्या नावे करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्यांनी खिरे यांच्याशी जमिनीचा खरेदी करार केला. त्यामुळे खिरे यांच्या नावे केलेले विक्रीपत्र हे खोटे व बनावट असून, हे खरेदीखत रद्द करावे, असा युक्तिवाद मानकर यांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या बाजूने निकाल देत त्यांना दिलासा दिला.
“खरेदी खत रद्द करण्याचा करण्यात आलेलल्या दावा दाखल करण्याची कालमर्यादा संपली आहे. केवळ सेलिब्रेटीकडून पैसे उकळण्यासाठी हा दावा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.” – ॲड. अमित राठी, धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचे वकील.





