Pune District : शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रामीण जीवनाचा अनमोल ठेवा राजुरीत जिवंत
Pune District : पूर्वी शेती कशी केली जात होती, शेतकरी कोणत्या साधनांचा वापर करीत होते, घरातील दैनंदिन कामे कशी पार पडत होती आणि मनोरंजनासाठी कोणती लोकवाद्ये वाजवली जात होती, याचे चित्र या संग्रहालयातून उभे राहते.

आळेफाटा : आजच्या आधुनिक युगात शेतीची अवजारे, स्वयंपाकघरातील साहित्य आणि ग्रामीण जीवनशैलीचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. मात्र, या बदलत्या काळात पूर्वजांच्या जीवनशैलीची साक्ष देणारा अनमोल वारसा राजुरी (ता. जुन्नर) येथे जतन करण्यात आला आहे. पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रातील वस्तुसंग्रहालयात शंभर वर्षांपूर्वीच्या शेतीच्या अवजारांपासून घरगुती वापरातील साहित्य, पारंपरिक वाद्ये आणि अनेक दुर्मीळ वस्तू पाहायला मिळतात. ग्रामीण संस्कृतीचा हा ठेवा पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांसह 30 हून अधिक देशांतील पर्यटकांनी भेट दिली आहे.
पूर्वी शेती कशी केली जात होती, शेतकरी कोणत्या साधनांचा वापर करीत होते, घरातील दैनंदिन कामे कशी पार पडत होती आणि मनोरंजनासाठी कोणती लोकवाद्ये वाजवली जात होती, याचे चित्र या संग्रहालयातून उभे राहते. येथे 15 ते 100 वर्षांपूर्वीच्या वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे संग्रहालय केवळ जुन्या वस्तूंचे प्रदर्शन न राहता ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी इतिहासाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरत आहे.
पूर्वीच्या शेतीव्यवस्थेची ओळख करून देणार्या वस्तूंमध्ये बैलगाडीची चाके, कोळपे, कुळव, पाभार, नांगर, जाडी, शिवळ, गोफण, लाकडी नक्षीदार चाडी, गवताचे ओझे बांधण्यासाठी वापरला जाणारा लाकडी मनी, छोटी मोट, बैलांच्या घुंगरमाळा, गोंडे आणि मुसकी अशा अनेक दुर्मीळ वस्तूंचा समावेश आहे. आज यंत्रांच्या साहाय्याने होणारी शेती पूर्वी बैलांच्या मदतीने आणि पारंपरिक अवजारांच्या जोरावर केली जात होती. या वस्तूंमधून जुन्या शेतीपद्धतीतील कष्ट, कौशल्य आणि निसर्गाशी असलेले नाते अनुभवता येते.
आज मिक्सर आणि आधुनिक उपकरणांमुळे सहज होणारी कामे पूर्वी घरातील मंडळी एकत्र येऊन पार पाडत असत. शेवया, कुरडया आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतींची माहिती या वस्तूंमधून मिळते. त्यामुळे जुन्या पिढीच्या आठवणींना उजाळा मिळतो, तर नव्या पिढीला पूर्वीच्या जीवनशैलीची ओळख होते.
जुन्या स्वयंपाकघरातील संस्कृतीचा ठेवा
ग्रामीण घरांतील पूर्वीचे स्वयंपाकघर आणि दैनंदिन जीवनाची ओळखही येथे होते. काठवट, पोळपाट-लाटणे, ताक घुसळण्याची रवी, शेवया करण्याचा पाट, उखळ-मुसळ, पाटा-वरवंटा, भेंड्याच्या विटा तयार करण्याचे विटाळे आणि शंभर वर्षांपूर्वीचा कुरडई बनविण्याचा सोर्या अशा वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
तत्कालीन कारागिरांचे कौशल्य
ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या टिमकी, चिपळ्या, लेझीम, डफ आणि हलगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांचाही संग्रह येथे आहे. सण, उत्सव, जत्रा, धार्मिक कार्यक्रम आणि लोककलेच्या सादरीकरणात या वाद्यांना महत्त्वाचे स्थान होते. या वाद्यांमधून पूर्वीच्या लोकजीवनातील आनंद, उत्साह आणि सामूहिक परंपरांचा मागोवा घेता येतो. जुन्या काळातील मेकअप बॉक्स, सुबक नक्षीकाम केलेल्या वस्तू, पेरणीची चाडी आणि शेवया बनविण्याचा नक्षीदार पाट यांमधून तत्कालीन कारागिरांचे कौशल्य आणि सौंदर्यदृष्टीही दिसून येते.
देशी बियाण्यांची छोटी सीड बँक
या संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया आणि देशी बियाण्यांचे जतन करण्यासाठी उभारलेली छोटी बीज बँक. बदलत्या शेतीपद्धतीत पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ग्रामीण संस्कृतीचा वारसा केवळ आठवणींमध्ये न राहता प्रत्यक्ष वस्तूंच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या ग्रामीण वस्तुसंग्रहालयाची व्याप्ती आणखी वाढवून अधिकाधिक दुर्मीळ वस्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याचा मानस आहे. या माध्यमातून आपल्या पूर्वजांचे जीवन, शेतीपद्धती आणि संस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देता येत आहे.
-मनोज हाडवळे, संचालक पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्र





