पुणे : पुर्ववैमन्सातून एका १७ वर्षाच्या मुलावर तिघांनी कोयत्याने डोक्यात, पाठीवर वार करुन हाताचा पंजा मनगटापासून वेगळा केला आहे. अभिषेक गणेश दोरास्वामी (१७ , रा. हडपसर) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. संचेती हॉस्पिटलमध्ये अभिषेक याला दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात येत आहेत.
याप्रकरणी मुलाचे वडिल गणेश राजन दोरास्वामी (४६ , रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील प्लॉट नं. ११ येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाबाहेर बुधवारी (दि.२) दुपारी पावणेतीन वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्लॉट नंबर ११ येथे रहायला आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक याचा यापूर्वी गल्लीतील मुलांबरोबर वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी अभिषेक याला हडपसर येथे राहायला ठेवले आहे. बुधवारी अभिषेक हा आपल्या आईवडिलांकडे आला होता. दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास तो सार्वजनिक शौचालयात गेला होता.
हे तिघा अल्पवयीन मुलांनी पाहिले. जुन्या वादाचा राग मनात धरुन हे तिघे अल्पवयीन मुले शौचालयाबाहेर दबा धरुन बसले. तो बाहेर येताच त्याच्या डोक्यावर, पाठीवर, डावे हातावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यांनी अभिषेकच्या डाव्या हातावर इतका जोरात वार केला की त्याचा पंजा मनगटापासून वेगळा झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करीत आहेत.