मावळातील शेतकऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

राज्य शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी मुकुंद ठाकर, मंगल दळवी यांची निवड
सलग तीन वर्षे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरस्कार
पवनानगर – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये सन 2018 साठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मावळ तालुक्यातील येळसे येथील मुकुंद बबन ठाकर व सन 2019 वर्षासाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार येळसे येथील महिला शेतकरी मंगल मारुती दळवी यांना तसेच 2018 साठी जिजामाता कृषिभूषण पुरस्कार वाहनगाव येथील प्राजक्ता गिरिधारी काळे यांना घोषित करण्यात आला आहे. सन 2017 मध्ये नितीन चंद्रकांत गायकवाड राहणार चांदखेड यांना पुरस्कार घोषित केला आहे.
मुकुंद बबन ठाकर यांनी आपल्या एक गुंठ्यापासून सुरू केलेल्या नर्सरी व पॉलिहाऊसचे आता पन्नास एकर क्षेत्रावर साई रोजेस या शेतकरी गटामार्फत निर्यातक्षम गुलाबाची शेती केली जाते. मंगल मारुती दळवी यांनी पाच गुंठा पासून सुरुवात केलेली नर्सरी आता अकरा एकरपर्यंत वाढवली आहे, त्याच बरोबर आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे.
प्राजक्ता गिरधारी काळे यांनी बोन्साय टेक्निकमध्ये प्राविण्य प्राप्त केले असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोन्साय झाडे तयार करतात. नितीन चंद्रकांत गायकवाड हे यांत्रिकीकरणावर शेती तसेच सेंद्रीय शेती करीत आहेत. जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
पुणे, मुंबई या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या व औद्योगिक क्षेत्रात वेगळी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील शेतकरी हे आधुनिक पध्दतीने शेती करत असल्याने मावळ तालुक्यात सलग तीन वर्षे शेतकऱ्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
काले कॉलनी मंडलातील येळसे येथील शेतकऱ्यांना सलग दोन वर्षे राज्यस्तरीय पुरस्कार गुलाब फुलांचे गाव म्हणून देश व विदेशात नाव आसणाऱ्या येळसे गावातील शेतकऱ्यांची सन 2018 मध्ये ठाकर यांना, तर 2019 मध्ये दळवी यांना सलग दोन वर्षे पुरस्कार जाहीर झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले सर्व जिल्हा व पंचायत समिती सदस्य गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी केले. हा सत्कार प्राप्त शेतकरी यांनी केलेली कामे सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.
पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. शेती करत असताना शेतकऱ्यांनी व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहणे गरजेचे आहे. महिलांनी यात पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करावा.
– प्राजक्ता काळे





