नवी दिल्ली : भारतीय हवाई दल प्रमुख ए.पी.सिंग यांनी गुरूवारी त्यांना वाटणारी खंत व्यक्त केली. त्यामधून त्यांनी संरक्षणविषयक प्रकल्पांसाठी होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले. एका कार्यक्रमात बोलताना सिंग यांनी संबंधित मुद्द्यावर रोखठोक भाष्य केले. मात्र, त्यांनी कुठल्या प्रकल्पांचा तपशील दिला नाही. तसेच, विलंबाचा कालावधीही नमूद केला नाही. कालमर्यादा हा मोठा मुद्दा आहे. त्यामध्ये वचनबद्धता येते. मात्र, एकदा कालमर्यादा दिल्यावर कुठला प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याचे आढळत नाही. जे पूर्ण होणार नाही; ते आश्वासन आपण का द्यावे? हे घडणार नसल्याची जाणीव असूनही आपण करारावर स्वाक्षरी करतो. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया बाधित होते, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि.कडून तेजस विमानांच्या डिलिव्हरीत मोठा विलंब झाला. त्यामुळे हवाई दल नाराज असल्याचे सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर, हवाई दल प्रमुखांनी केलेल्या टिप्पणीचे महत्व वाढले आहे.