Delhi Terror Alert: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा दिल्लीतील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी लाल किल्ला, चांदणी चौक आणि आसपासच्या प्रमुख परिसरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढवण्यात आली असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लष्कर-ए-तैयबाकडून आयईडी (IED) आधारित स्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून सीसीटीव्ही देखरेख, वाहनांची कसून तपासणी आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त जवानांची नियुक्ती केली आहे. विशेषतः चांदणी चौक परिसरातील एका प्रसिद्ध मंदिराला लक्ष्य केले जाण्याची शक्यता असल्याने तिथे विशेष खबरदारी घेतली जात आहे. कडक सुरक्षा व्यवस्था – १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही. या संदर्भात बॉम्ब शोधक आणि नाशक पथके तसेच क्विक रिस्पॉन्स टीम्सना मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले असून नागरिकांना कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा हालचालीबाबत त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत दिल्लीत महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. स्वतःला ‘एनआयए’ अधिकारी सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील मुदस्सिर नावाच्या तरुणाला लाल किल्ल्याजवळून अटक करण्यात आली आहे. याशिवाय, लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात एनआयएने डॉ. बिलाल नसीर मल्ला यालाही ताब्यात घेतले असून तो या प्रकरणातील आठवा आरोपी ठरला आहे. सध्या दिल्लीत तणावपूर्ण शांतता असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता केवळ खबरदारी बाळगावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.