कुविख्यात गुंड व त्याच्या सहकाऱ्यावर वाईच्या न्यायालय परिसरात गोळीबार

वाई (प्रतिनिधी) – मेणवली (ता. वाई ) येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) व त्याच्या सहकाऱ्यावर आज वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाला.
दोन गोळया झाडल्या गेल्या असून कोणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबार करणारे संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र, त्यांची नेमकी संख्या समजली नाही.
मेणवली (ता. वाई ) येथील हॉटेल माधवन इन्टरनँशनलच्या मालकास मागितलेल्या खंडणी प्रकरणी कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव, निखिल मोरे, अभिषेक मोरे यांना शनिवारी दि. ५ रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
त्यानंर कोठडी संपल्यानंतर आज सोमवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आणले होते. त्यावेळी ही गोळीबाराची घटना घडली. घटनेनंतर न्यायालय व आवार पूर्ण बंद करून घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता.





