यादगीर (कर्नाटक) : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात एका नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या स्वच्छतागृहात एका मुलाला जन्म दिला. ही विद्यार्थिनी सरकारी शाळेत शिकते. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली. मात्र, या गोष्टीची खबर तिने कुणालाच दिली नव्हती. त्यामुळे आता शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि संबंधित मुलीच्या घरचे असे सर्व जण अडचणीत आले आहेत. बुधवारी ज्यावेळी या विद्यार्थिनीच्या वर्गमित्रांना लक्षात आले की, त्या विद्यार्थिनीला प्रसूती वेदना होत आहेत. तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यांनी शाळा प्रशासनाला माहिती दिली. तथापि, सदर विद्यार्थिनीने घटनेची माहिती देण्यास किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला. यादगीर पोलिस म्हणाले की, विद्यार्थिनीने अधिकाऱ्यांना फक्त शौचालयात पोटदुखी होत असल्याचे सांगितले आणि तिने तिथेच मुलाला जन्म दिला. ही विद्यार्थीनी आणि तिचे मूल या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघेही ठीक आहेत. पोलिसांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापन किंवा पीडितेच्या भावाने त्यांना घटनेची माहिती दिली नाही. तपासादरम्यान, पोलिसांनी एका व्यक्तीला आरोपी म्हणून ओळखले आहे. हा आरोपी २८ वर्षीय आहे. यासह, जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वसतिगृह वॉर्डन, शाळेचे मुख्याध्यापक, स्टाफ नर्स आणि पीडितेच्या भावासह इतर चार जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर मुलीच्या गरोदरपणाबद्दल अधिकाऱ्यांना माहिती न देण्याचा आरोप आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुलगी सतत शाळेत जात होती. दरम्यान, कर्नाटक रेसिडेन्शियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असोसिएशने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवण्यात निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल मुख्याध्यापक आणि वसतिगृह वॉर्डनसह चार शाळेतील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिसांनी काय म्हटले? या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. कोणाची चूक आहे हे पोलिस शोधत आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आम्ही कारवाई करू. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आम्ही कारवाई करू. ही अतिशय महत्त्वाची बाब पालकांनी लपवून ठेवली. शिवाय याप्रकरणी आता बालविवाहाचा दुसराच गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली. या प्रकरणी आता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल आणि वसतिगृहातील समस्यांबद्दल माहिती मिळवली जाईल. बाल हक्क आयोगाचे सदस्य शशिधर कोसुंबे यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधले आणि सांगितले की मुलीचे शारीरिक बदल होत असताना त्यांनी लक्ष द्यायला हवे होते.