Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला नवे वळण; सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना फोन?
Sunetra Pawar : एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

Sunetra Pawar : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या विलिनीकरणाबाबत विविध नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात असून, राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मात्र, दोन्ही पक्षांतील आमदारांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशातच आता या चर्चेला नवे वळण देणारी माहिती समोर आली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. या फोनद्वारे आमदारांची विलिनीकरणाबाबतची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ‘लवकरच तुम्हाला कळेल,’ अशी मोजक्या शब्दांत सूचक प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या विधानानंतर आता आमदारांना फोन गेल्याची माहिती समोर आल्याने विलिनीकरणाच्या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्याकडे विलिनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, ‘माझा भाऊ गेला, तो विषय आता संपला,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
एकीकडे विलिनीकरणाबाबत नेत्यांकडून सूचक विधाने केली जात असताना, दुसरीकडे आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये पडद्यामागे नेमक्या कोणत्या राजकीय हालचाली सुरू आहेत, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आमदारांची भूमिका, पक्षश्रेष्ठींची पुढील रणनीती आणि विलिनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय काय असणार, याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
H-1B : आधीची मंजुरी आता पुरेशी नाही? H-1B सह पाच व्हिसांबाबत अमेरिकेचा मोठा प्रस्ताव






