Pune District : एआयच्या बळावर शेती समृद्धीचा नवा अध्याय : सुनेत्रा पवार
Pune District : या योजनेमुळे शेती समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

प्रभात वृत्तसेवा
पुणे : शेती अधिक उत्पादक, शाश्वत आणि आधुनिक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. ही दूरदृष्टी ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधुनिक शेतीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. याच ध्येयाचा पुढील टप्पा म्हणून ऊस उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘अजितदादा पवार कृषी समृद्ध कर्ज योजना’ सुरू करण्यात आली असून, या योजनेमुळे शेती समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘आदर्श शेतकरी सन्मान सोहळा’ प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील होते. व्यासपीठावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, साखर आयुक्त संजय कोलते यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी राज्य शासनाने महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा दिल्याचे सांगत शेतीतील त्यांच्या वाढत्या योगदानाचा गौरव केला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पीडीसीसी बँकेचे वर्णन शेतकऱ्यांसाठी ‘कल्पतरू’ असे केले, तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘एआय’ला शेतीतील हुशार सल्लागार मानून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. बँकेच्या ठेवी ३१४ कोटींवरून १७ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा प्रवास माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अधोरेखित केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
कृषी पुरस्कारांचे शानदार वितरण
या सोहळ्यात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचे ‘कृषी पुरस्कार-२०२४’ प्रदान करण्यात आले. यामध्ये ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ छाया पवार आणि तानाजी पवार यांना, तर ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ समीर डोंबे व सुजाता डोंबे या दांपत्याला देऊन गौरवण्यात आले.





