महाठग ‘सुकेश चंद्रशेखर’ याच्यावर तयार होणार सिनेमा; जेलच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा झाली चर्चा…

नवी दिल्ली – हाय-प्रोफाइल लोकांना 200 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घालणारा आणि बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट देऊन प्रकाशझोतात आलेला ‘सुकेश चंद्रशेखर’ याने गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचीच झोप उडवली आहे. सध्या सुकेश चंद्रशेखकर याला दिल्लीच्या मंडोली कारागृहात ठेवण्यात आलं आहे. तुरुंगात देखील तो सर्व सुखसुविधा उपभोगत असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसून आलं होत.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्रींना आपल्या प्रेमाच्या जाळयात अडकवणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याच्यावर आता चक्क एक चित्रपट तयार होणार आहे. चित्रपट निर्माते आनंद कुमार हे या चित्रपटाची निर्मिती करत असून, चित्रपटाची स्क्रिप्ट देखील सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. आनंद कुमार यांनी स्क्रीप्टसाठी जेलच्या अधिकाऱ्यांसोबत देखील संपर्क केलाय.
चित्रपटासाठी ते अधिकाऱ्यांकडून काही महत्वाची माहिती घेणार आहेत. या चित्रपटात सुकेश चंद्रशेखर याच्या पर्सनल लाईफपासून मनी लाँड्रिंगपर्यंत सर्वकाही दाखवले जाणार आहे. तसेच, तो जेलमध्ये कशाप्रकारचे आयुष्य जगतोय हे सुद्धा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटात सुकेश चंद्रशेखर, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या भूमिकेत कोण दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी काळ याची वाट पाहावी लागणार आहे.





