Nagar | महायुती सरकारकडून कर्जाचा डोंगर – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शेवगाव, (प्रतिनिधी) – सध्याच्या भाजपा युतीच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यात वाढ झाली असून, आता कॉन्ट्रॅक्टर वर्गाच्या आत्महत्या महाराष्ट्रात सुरू होतील, कारण तिजोरीत पैशाचा खडखडाट असतांना मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर काढल्या जात आहेत. अनेक योजना आणि घोषणा जाहीर केल्या जात आहेत.
सरकारने रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे म्हणजे जाता जाता हे दहा लाख कोटीपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर कर्ज करायला कमी करणार नाहीत,
म्हणून लवकरात लवकर निवडणूका व्हाव्यात म्हणजे जनताच त्यांना त्यांचा रस्ता दाखविल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी सायंकाळी शेवगाव दाखल झाली.
यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. दुपारी एक वाजताची सभा तब्बल सात उशिराने सुरु झाली. यावेळी खा .अमोल कोल्हे, खा.नीलेश लंके, महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,
अॅड. प्रताप ढाकणे, तालुकाध्यक्ष हरीश भारदे, शिवशंकर राजळे, माजी आमदार संजय वाघचौरे, संदीप वर्पे, सुनील गव्हाणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले , सरकारने अफगाणिस्तानातून पानिपतला कांदा आणला आणि कांद्याचे दर आता परत कोसळायला लागलेत. म्हणजे आमच्या कांद्याचे पानिपत करण्याचं काम पुन्हा एकदा भाजपच्या दिल्लीच्या सरकारने केले आहे.
येथून चार किलोमीटर अंतरावर धरण असूनही पंधरा दिवसाने नळाला पाणी सुटते. येथील शेतकऱ्यांना पीक विमा सर्वात कमी मिळाला, लोकप्रतिनिधींचे लक्षच नसल्याने हे घडले आहे.
खासदार नीलेश लंके म्हणाले, महविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यावर शेवगावचा पाणी व ताजनापूरचा प्रश्न प्राध्यानाने सोडवू .महेबुब शेख यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. खासदार कोल्हे यांनी सरकारच्या योजनांवर निशाणा साधला.





