Thergaon : आगीच्या भडक्यात अडकलेल्या आईची धडपड; थेरगावात थरार
Thergaon: अग्निशामक दलाने वाचवले प्राण

पिंपरी – शुक्रवारी सायंकाळची साडेसहाची वेळ… घरात रोजच्यासारखीच लगबग सुरू होती. तितक्यात गॅसची दुर्गंधी आली आणि काही कळायच्या आत क्षणात भडका उडाला. आगीच्या रौद्ररूपाने संपूर्ण घराला वेढले. धुराचे लोट आणि ज्वाळा पाहून घाबरलेल्या मुलाने घराबाहेर धाव घेत कसातरी जीव वाचवला खरा, पण आत अडकलेल्या आईच्या जिवाची चाललेली घालमेल संपूर्ण परिसराची धडधड वाढवणारी ठरली.
थेरगावातील गायत्री लॅन्डमार्क सोसायटीतील ‘सी’ विंगमधील ३०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. आग भडकल्याचे लक्षात येताच आईने स्वतःचा बचाव करण्यासाठी बेडरूमकडे धाव घेतली आणि दरवाजा आतून बंद केला. मात्र, आगीच्या ज्वाळांपेक्षाही विषारी धुराचे लोट खोलीत घुसू लागले आणि श्वास घेणेही असह्य झाले. अखेर जिवाच्या आकांताने त्यांनी खिडकी उघडून मदतीसाठी हात हलवले.
खाली रस्त्यावर आणि आसपासच्या दुकानांत ऐन गर्दीची वेळ होती. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून निघणारे काळेकुट्ट धुराचे लोट आणि खिडकीत मदतीसाठी असहाय्य उभी असलेली महिला पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. शेजारील इमारतींमधील नागरिकही भीतीने रस्त्यावर धावून आले. परिसरात एकच आक्रोश आणि धावपळ उडाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिक अनिकेत येवले आणि रामचंद्र खोसे यांनी तत्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत थेरगाव, रहाटणी आणि मुख्यालयाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीच्या ज्वाळांशी दोन हात करत बेडरूमच्या खिडकीत अडकलेल्या आईची अत्यंत शिताफीने सुटका केली. आई सुखरूप बाहेर आल्याचे पाहताच मुलाच्या आणि उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.
या दुर्घटनेत आई आणि मुलगा किरकोळ भाजले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने दोघांचे प्राण वाचले असले, तरी संसाराची मात्र अक्षरशः राखरांगोळी झाली. टीव्ही, फ्रिज, लॅपटॉप, मोबाइल आणि फर्निचरसह संपूर्ण संसार डोळ्यांदेखत जळून खाक झाला असून, सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. एका क्षणात सर्वस्व हिरावून घेतले तरी ‘माझा मुलगा आणि मी जिवंत आहोत’ हाच त्या माऊलीसाठी सर्वात मोठा दिलासा ठरला.
Ranjangaon : दुष्काळ, पाणीटंचाई, बिबट्याची भीती





