nagar | कुटुंब चालवण्याच्या लढाईत झाडे वाचवण्याचा संदेश

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देण्यासाठी आणि निसर्गाकडे संवर्धन करण्यासाठी शहरातील एका रिक्षा चालवणाऱ्या युवकाने आपल्या रिक्षातच कुंडीत झाडांचे रोपण केले आहे. सध्याच्या घडीला झाडे वाचली तरच माणूस वाचेल, असा आगळावेगळा संदेश यातून हा तरुण सर्वांना देत आहे.
आता ठिकठिकाणी नेतेमंडळी, उत्साही कार्यकर्ते ,संस्था, मंडळे झाडे लावण्याचा उपक्रम सुरू करून फोटोसेशन करतील.त्यांनतर लावलेल्या झाडे जळून गेली तरी त्याकडे ढुंकून कुणी पाहणार नाही, हेच सार्वत्रिक चित्र असते. परंतु याला छेद देत शहरातील जुना कचेरी मागे राहणारा संजय शंकर खंडागळे यांनी आपल्या रिक्षेत झाडे लावले आहेत.
त्याचे तो संगोपनही करत आहेत. रिक्षात बसलेल्या प्रवासांना झाडे लावण्याचा संदेश देत आहेत. या युवकाने कोरोना काळात आपल्या रिक्षेत पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून लोकांना हात धुण्यासाठी पाणी ठेवले होते. त्याचबरोबर सॅनिटायझरची व्यवस्था पण गाडीत केलेली होती. त्याच्या या उपक्रमाचा शहरातील विविध संघटनांनी सन्मान केला होता.
पालिकेच्या माध्यमातून तत्कालीन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी त्याचा सन्मान करून गौरव केला होता. आता या युवकाने रिक्षामध्ये झाडे लावून त्यांचा संगोपन करून वेगळा संदेश शहरवासियांना दिला आहे. संजय खंडागळे यास पत्नी, दोन मुले ,एक मुलगी तसेच एक बहीण व त्याचा मुलगा या सर्वांचे रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून संसाराचे गाडे चालवत आहे.
विशेष म्हणजे या युवकाला कुठलेही व्यसन नाही. त्याच्या या उपक्रमाचे शहरात स्वागत होत आहे. खंडागळे यांनी आपल्या रिक्षात लावलेल्या झाडाच्या कुंडीवर झाडे लावा आणि झाडे जगवाचा संदेश दिला आहे.





