विशाखापट्टणम (आंध्र पदेश) : अनाकापल्ली येथे टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागलेल्या भीषण आगीत एका ७० वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना यलमंचिलीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत रेल्वेचे दोन एसी डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटानगरहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणारी ही रेल्वेगाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने धावत होती. रात्री साधारण १२:४५ च्या सुमारास ट्रेन अनाकापल्ली स्थानकातून सुटल्यानंतर नरसिंहबल्ली येथे रेल्वेच्या डब्यातून ठिणग्या आणि आगीच्या ज्वाळा निघताना लोको पायलटच्या निदर्शनास आल्या. प्रसंगावधान राखून तातडीने रेल्वे थांबवण्यात आली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या भीषण आगीत बी-१ आणि एम-२ हे दोन एसी डबे आगीच्या विळख्यात सापडले. दुर्दैवाने, बी-१ डब्यातून प्रवास करणाऱ्या ७० वर्षीय चंद्रशेखर सुंदरम यांचा होरपळून मृत्यू झाला. ज्यावेळी आग लागली, तेव्हा बी-१ डब्यात ८२ आणि दुसऱ्या बाधित डब्यात ७६ प्रवासी होते. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही डबे कोळसा झाले होते. या आगीत प्रवाशांचे मौल्यवान साहित्यही जळून भस्मसात झाले.