Sangli : सांगलीत तब्बल 300 किलो गांजा जप्त; संशयित कोरेगाव तालुक्यातील
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३०० किलो गांजासह एकूण एक कोटी ६५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Sangli – अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या वाहनास ताब्यात घेत येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३०० किलो गांजासह एकूण एक कोटी ६५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पथकाला याबाबत सूचित केले होते. मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड गाडी (क्र. एनएल ०१ एडी ९३६६) कंटेनरमधून तयार गांजा घेऊन मिरज ते पंढरपूर रस्त्याने वाहतूक करणार आहे, अशी माहिती पथकाला आज दि. २० रोजी मिळाली.
त्यानुसार मिरज- पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा येथे सापळा रचून वाहन ताब्यात घेण्यात आले. कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील कप्प्यातून चिकटपट्टीने गुंडाळलेले पॅकेट मिळाले असता, त्यात अंदाजे ३०० किलो वजनाचा हिरवट काळपट रंगाचा तयार गांजा आढळून आला.
चौकशीत संशयिताने हा गांजा बालेघाट ते तुंबडी (राज्य ओडिशा) दरम्यान असणाऱ्या एका शेतामधून आणल्याचे व पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक निशाणदार यांनी पंचनामा करून गांजा व वाहन ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्यासह सहायक फौजदार सुभाष सूर्यवंशी, हवालदार सागर लवटे, संदीप गुरव,
अतुल माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, दऱ्याप्पा बंडगर, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अरुण पाटील, संकेत मगदुम, पोकॉ विक्रम खोत, बाळू सुतार, सूरज थोरात, सोमनाथ पतंगे, मोतीराम खोत, महेश कुंभार तसेच सायबर पोलीस ठाण्याचेकॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांनी ही कारवाई केली.





