बुध येथे दुचाकींच्या अपघातात फडतरवाडीचा एकजण ठार

पुसेगाव – फलटण ते पुसेगाव रस्त्यावर बुध गावच्या हद्दीत एका दुचाकीस दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने अपघातात फडतरवाडीचे बापलेक गंभीर झाले होते. त्यापैकी रामदास शामराव फडतरे (वय 45) यांचा मृत्यू झाला. तर मुलगा तन्मय रामदास फडतरे गंभीर जखमी झाला आहे.
अधिक माहिती अशी, बुध गावच्या हद्दीत हा अपघात रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास झाला. नायरा पेट्रोल पंपासमोरुन रामदास शामराव फडतरे व त्यांचा मुलगा तन्मय रामदास फडतरे हे मोटर सायकल (एम.एच. 11 बीडब्ल्यू 7822) या गाडीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या (एम.एचा. 11 डीजी 2160) या मोटरसायकलने फडतरे यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. याप्रकरणी दुचाकी चालक अमोल आनंदराव पवार (रा. डिस्कळ, ता. खटाव) याच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुभम अंकुश फडतरे (वय 24) याने तक्रार दिली आहे. तपास चंद्रहार खाडे करीत आहेत.





