Dr. Anjali Salve : रोहिणी खडसेंना मोठा धक्का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नव्या महिला अध्यक्षाची निवड होणार
Dr. Anjali Salve : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षपदी डॉ. अंजली साळवे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Dr. Anjali Salve : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या महिला अध्यक्षपदाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
महिला अध्यक्षपदाची जबाबदारी आता विदर्भाकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा असून, नागपूर विभागातून नव्या महिला अध्यक्षांची निवड जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षपदी डॉ. अंजली साळवे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पक्षाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
सध्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता ही जबाबदारी डॉ. अंजली साळवे यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांना पक्षाकडून पुढे कोणती जबाबदारी दिली जाते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत डॉ. अंजली साळवे?
डॉ. अंजली साळवे या पक्षाची भूमिका आक्रमकपणे आणि सडेतोडपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीवरून त्यांनी यापूर्वी प्रश्न उपस्थित केले होते.
महिलांसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या तसेच महिलांशी संबंधित कायद्यांची सखोल माहिती असलेल्या महिलांचीच महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. या पदाचा उपयोग केवळ महिलांच्या पुनर्वसनासाठी होऊ नये, असेही त्यांनी म्हटले होते.
महिलांशी संबंधित विविध प्रश्नांसह इतर अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही डॉ. साळवे यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली आहे.
रोहिणी खडसेंकडे होती तीन वर्षे जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी रोहिणी खडसे यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. पक्षाच्या नियमानुसार महिला अध्यक्षांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. रोहिणी खडसे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण झाला आहे.





