Delhi Police : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे मोठे कारस्थान उधळले; दिल्ली पोलिसांकडून ११ जणांना अटक
लष्करी हालचालींचा अभ्यास करून भविष्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा हा कट होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

Delhi Police – भारतीय लष्कराच्या हालचालींवर थेट पाकिस्तानातून नजर ठेवणाऱ्या एका मोठ्या हेरगिरीच्या जाळ्याचा दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पर्दाफाश केला आहे. आयएसआय समर्थित या मॉड्यूलने उत्तर भारतातील मोक्याच्या लष्करी तळांजवळ सौरऊर्जेवर चालणारे छुप्या पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संवेदनशील माहिती सीमापार पोहोचवण्याचा कट रचला होता.
या प्रकरणी पोलिसांनी दोन टप्प्यांत कारवाई करत आतापर्यंत ११ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि तांत्रिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. हे हेरगिरीचे जाळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील संवेदनशील शहरांमध्ये पसरले होते. विशेषतः कपूरथला, पठाणकोट, अंबाला आणि बीकानेर यांसारख्या लष्करी छावण्या असलेल्या भागांतील महामार्ग व प्रवेशद्वारांवर हे कॅमेरे बसवण्यात आले होते.
तपासातील माहितीनुसार, हे कॅमेरे सौरऊर्जेवर चालणारे असल्याने चोवीस तास कार्यरत राहत असत आणि बनावट सिमकार्डच्या माध्यमातून एका मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पाकिस्तानमधील हँडलर्सना भारतीय सैन्याच्या हालचालींचे लाईव्ह स्ट्रीमिंग पुरवत होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने लष्करी गुप्तचर विभागाच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली.
या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार पंजाबचा रहिवासी मनप्रीत सिंग असल्याचे निष्पन्न झाले असून, तो थेट पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. स्थानिक तरुणांना पैशांचे आमिष दाखवून बनावट सिमकार्ड मिळवणे आणि कॅमेरे बसवण्याच्या कामासाठी वापरले जात होते.
केवळ माहिती गोळा करणे हाच यामागचा हेतू नसून, लष्करी हालचालींचा अभ्यास करून भविष्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा हा कट होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या पोलीस जप्त केलेल्या डेटाच्या आधारे या नेटवर्कशी संबंधित इतर स्लीपर सेल्सचा शोध घेत आहेत.






