Petrol and Diesel – आगामी काळात पेट्रोल आणि डीझेलही महागण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर असल्याने तशी शक्यता सरकारी सुत्रांनी वर्तवली. पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रतिपिंप ११० डॉलर्सवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक इंधन कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ते नुकसान लिटरमागे पेट्रोलसाठी सुमारे २० रूपये, तर डीझेलसाठी तब्बल १०० रूपये इतके असल्याचे सांगितले जात आहे. मागील ४ वर्षांपासून पेट्रोल आणि डीझेलचे रिटेल दर स्थिर ठेवण्यात आले. मात्र, स्थिती बदलल्याने पेट्रोल आणि डीझेलच्या दरांतही बदल म्हणजेच वाढ अटळ असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. येत्या पाच ते सात दिवसांमध्ये निर्णय जागतिक तेल व्यापार आणि युद्धाचा परिणाम या स्थितीकडे सरकार लक्ष ठेवून आहे. पण, येत्या पाच ते सात दिवसांमध्ये इंधन आणि एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे, असे ‘इंडिया टुडे’ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. या संदर्भात सध्या चर्चा सुरु असून, दरवाढ पुढे ढकलता येईल का याबाबतही चाचपणी सुरु आहे. तेल कंपन्यांवरील आर्थिक बोजा आणि महागाई या समन्वय साधण्याचा प्रयत्न देखील सरकार करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, ही दरवाढ झाल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.