Pune News : पुणे विमानतळावरील मोठी दुर्घटना टळली! धावपट्टीवरून विमान ‘टेक अॅाफ’ करणार इतक्यात…; नेमकं काय घडलं?

Pune News : पुण्याहून भुवनेश्वरच्या दिशेने झेपावण्यासाठी धावपट्टीवर वेगाने धावणारे विमान अचानक थांबविण्यात आले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (आयएक्स -१०९८) विमानाला उड्डाणाच्या क्षणी पक्ष्याची धडक बसली. यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान राखत निर्णायक क्षणी विमानाचे उड्डाण थांबविल्याने पुढे घडणारी मोठी दुर्घटना टळली.
ताशी २८० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनात पक्षी शिरल्याने सात ब्लेडचे नुकसान झाले आहे. मात्र, ही काय पहिलीच घटना नसून याअगोदर अशा घटना घडलेल्या आहेत. २०२५ मधील ही आतापर्यंतची १२ वी घटना आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्याहून दुपारी चार वाजून १० मिनिटांनी हे विमान भुवनेश्वरसाठी उड्डाण करणार होते. विमान धावपट्टीवर आल्यानंतर उड्डाणासाठी वेगाने धावत होते. धावपट्टीवरून विमान आकाशाकडे झेपावताना काही सेंकद आधीच विमानाच्या उजव्या इंजिनला पक्ष्याची धडक बसली. यात पक्षी आत ओढला गेल्याने इंजिनचे मोठे नुकसान झाले. परिणामी विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले.
प्रवाशांचे हाल
या घटनेनंतर प्रवासी घाबरले होते. त्यामुळे प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात आले. विमान धावपट्टीवरून पुन्हा पार्किंग बे मध्ये आणण्यात आले. विमान थाबंल्यानंतर तात्काळ या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.
दखल कधी घेणार?
भुवनेश्वरला जाणारे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पुणे विमानतळावर बर्ड हिटच्या पाच वर्षात 145, तर या वर्षात आतापर्यंत 11 घटना घडल्या आहेत. ही १२ घटना आहे. यामुळे याची गंभीर दखल विमानतळ प्रशासन, हवाई दल कधी घेणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.





