Indrayani Bridge: पवित्र इंद्रायणीच्या पुलावरच कचऱ्याचे साम्राज्य!
Indrayani Bridge: प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळेझाक का करीत आहे?

देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू असो अथवा तीर्थक्षेत्र येलवाडी, दोन्ही गावांच्या मुख्य प्रवेशद्वारांवरच येलवाडी गावच्या हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुतर्फा साचलेले कचऱ्याचे ढिगारे वाऱ्याने उडून थेट रस्त्यावर तसेच नदीपात्रात जात असल्याने पवित्र इंद्रायणीला घाणीचा विळखा पडला आहे. तीर्थक्षेत्राच्या प्रवेशद्वारावरच असा कचऱ्याचा पसारा असताना प्रशासनाला हे चित्र दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
इंद्रायणी नदीवरील पुलाला येलवाडी ग्रामस्थांनी संत भागीरथी पूल असे नाव देणारा फलक लावला आहे. मात्र, याच फलकाखाली मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे विदारक चित्र दिसत आहे. त्यामुळे श्रद्धास्थानाच्या नावालाच कचऱ्याने काळिमा फासल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
देहू–येलवाडी हद्दीतील प्रवेशमार्ग, रस्त्यांच्या कडेला तसेच पुलाच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांभोवती मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून वाहनांच्या मागे कुत्रे धावत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळेझाक का करीत आहे? नदी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, याचीही नागरिकांमध्ये चर्चा आहे.
पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषित होत असताना प्रशासन आणखी किती दिवस गप्प बसणार? असा संतप्त सवाल करीत कचरा तातडीने हटवावा, कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी आणि भविष्यात या ठिकाणी कचरा साचणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Pimpri-Chinchwad: डीजेचा दणदणाट की धोक्याची घंटा? हृदयविकार, कानांचे विकार आणि अस्वस्थतेचा धोका





