पुण्यात सराफी दुकान फोडून तब्बल ८४ लाखांची चोरी

पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार पेठेतील माणिक ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत तब्बल ८४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १४ सप्टेंबरच्या रात्री ते १५ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत घडली.
फिर्यादी विनोद देवीचंद परमार ( ४१, रा. मुकुंदनगर, पुणे) हे चांदीचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांच्या दुकानातील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करून चांदीचे दागिने, मूर्ती, रोख रक्कम आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरला.
चोरट्यांनी लंपास केलेल्या मालामध्ये ४५ किलो चांदीचे पैंजण (किंमत अंदाजे ४० लाख रुपये), १५ किलो चांदीचे कडे, चैन, ब्रेसलेट व कॉईन (किंमत अंदाजे १३.५० लाख रुपये), १० किलो चांदीच्या देव मूर्ती (किंमत अंदाजे ९ लाख रुपये), रोख ५ लाख रुपये आणि १० हजार किमतीचा डीव्हीआर असा एकूण ८४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी धावून आले. पोलिस उप आयुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्यासह खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व गुन्हे शाखेचे अधिकारी सकाळपासून तपासात गुंतले होते. सध्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.





