पुणे जिल्हा | नगर महामार्गावर होर्डींग्जचा विळखा

शिक्रापूर, (वार्ताहर)- मुंबई येथील घाटकोपरमध्ये नुकतीच होर्डींग्ज कोसळून पंधरा जणांचा बळी गेला. यापूर्वी पुणे नगर महामार्गवर देखील अशा अनेक घटना घडल्या होत्या. आज देखील नगर महामार्गावर होर्डींग्जचा विळखा असून प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाला आता तरी जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शिक्रापूर येथे नगर महामार्गावरील सणसवाडी, कोरेगाव भीमा, वाघोली, लोणीकंद, रांजणगाव गणपती यांसह आदी ठिकाणी दोनशेहून अधिक अनधिकृत होर्डींग्जचे मनोरे उभे आहेत. कोणत्याही होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी पुण्यात मोठी दुर्घटना घडली तर शिक्रापूर, लोणीकंदसह वाघोली येथे काही घटना घडलेल्या असताना देखील याबाबत प्रशासकीय यंत्रणा यावर आवर घालण्यात अपयशी ठरली आहे.
होर्डींग्जमुळे अनेकदा वाऱ्याने फ्लेक्स फाटून विजेच्या तारांना चिटकल्याने आगीच्या देखील घटना घडल्या आहेत. हे होर्डींग्ज नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे एका मोठ्या दुकानावर होर्डींग्ज पडले. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नव्हती. मात्र, प्रशासनाने दखल घेतली आहे. आता पुण्यानंतर घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडलेली असताना प्रशासन आता तरी तोग्य खबरदारी घेऊन जीवघेणे होर्डींग्ज काढून टाकून कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांना पडला आहे.
होर्डींग्जधारकांना राजकीय अभय
पुणे- नगर महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभे असलेले अनेक होर्डींग्ज राजकीय व्यक्तींच्या जागेमध्ये अथवा इमारतीवर असल्याने या होर्डींग्जधारकांना राजकीय अभय मिळत असून त्यावर कारवाईसाठी कोणीही पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.
आमच्याकडे कुणीही परवानगी घेतली नाही
सरपंच रमेश गडदे म्हणाले की, शिक्रापूर येथे घडलेल्या एका जुन्या होर्डींग्ज दुर्घटनेनंतर आम्ही सर्व होर्डींग्जची पाहणी करुन जागा मालकांना नोटीस बजावत रितसर परवानगी घ्या, असे कळविलेले आहे. मात्र यातील कुणीही ग्रामपंचायतीकडे येत नाही. त्यामुळे शिक्रापुरात पुन्हा दुर्घटना घडल्यास स्थानिक ग्रामपंचायतीला जबाबदार धरुन चालणार नाही.
कारवाईचे आदेश आहेत
शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की, कोठेही धोकादायक पद्धतीने तसेच विद्रुपीकरण होणाऱ्या फ्लेक्स बाबत जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व नगरपालिका यांना कारवाई करण्याबाबतचे आदेश काही कायद्यानुसार दिलेले असल्याचे त्यांनी सांगितले.




